राजकीय गणितांना छेद देत कांबा ग्राम पंचायतीवर गावदेवी पॅनलची बाजी

राजकीय गणितांना छेद देत कांबा ग्राम पंचायतीवर गावदेवी पॅनलची बाजी

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीपैकी सरपंच आणि उपसंरपंचपदाच्या दुसऱ्या टप्यातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. मात्र संपूर्ण तालुक्यात कांबा ग्रामपंचायत चर्चेची ठरली आहे. राजकीय गणितांना छेद देत कांबा’मध्ये गावदेवी पॅनलने बाजी मारत सरपंच-उपसरपंचपद आपल्याकडे खेचून घेतले.

स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात लढणारे उमेदवार निवडून आल्यावर ‘मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा’ असा तळ्यातमळ्यात पवित्रा घेत होते. त्याचा फायदा घेण्यासाठी व आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला होता. प्रतिष्ठेची असलेती कांबा ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरु होती. 

सोमवारी झालेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत गावदेवी पॅनलने निर्णायक मत आपल्या बाजूने राखून सत्ता हस्तगत केली. यावेळी निवडणुकीचे कामकाज पाहणारे अध्यदेशी अधिकारी जे. एन. गाऱ्हाणे यांनी सरपंचपदी भारती महेंद्र भगत तर उपसंरपंचपदी संदीप कुंडलिक पावशे हे दोघेही १३ पैकी  ७ मते मिळवून विजयी झाल्याचे घोषित केले. तालुक्यात सर्वात कारखाने आणि उद्योग असणाऱ्या कांबा ग्रामपंचायतीवर गावदेवी पॅनलने अखेरीस आपली सत्ता प्रस्थापित केली. 

सोनाली विजय उबाळे, छाया कुंडलिक बनकरी, इशा विजय भोईर, संतोष पावशे, हरेश सवार या सदस्यांनी गावदेवी पॅनलच्या बाजूने मतदान केले. टीओके टीमचे ओमी कलानी यांनी या निवडणुकीत गावदेवी पॅनलला मोठे सहकार्य केले. त्याच प्रमाणे ग्रामस्थ मदन उबाळे, छगन बनकरी, रविंद्र शांताराम शिरोसे, बाळाराम भोईर, अनंता ठाकरे, वसीम खान यांनी मोठ्या प्रमाणात गावातील एकता राखत गावदेवी पॅनलच्या विजयासाठी मोलाचे सहकार्य केले.