मुलींनी कुटुंबियांकडे बिनधास्तपणे मन मोकळे केले पाहिजे - सपना देवनपल्ली

कल्याण (प्रतिनिधी) :
मुलींनी न्यूनगंड बाजूला ठेऊन कुटुंबियांकडे बिनधास्तपणे आपले मन मोकळे केले पाहिजे, असे मत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी कल्याण येथे व्यक्त केले. गुरुवारी सहयोग सामाजिक संस्था आणि स्थानिक नगरसेविका शीतल महेश मंढारी यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेतील आमराई परिसरातील तिसाई विद्यालय येथे विद्यार्थीनींना मोफत जैविक सॅनिटरी नॅपकिन वाटप कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
देवनपल्ली पुढे म्हणाल्या की, जैविक सॅनिटरी नॅपकिन हे प्रत्येक स्त्रीने वापरले पाहिजे. त्याचे योग्य विघटन होते व पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही. आज मी तुमच्या समोर जे बोलते आहे ते फक्त शिक्षणामुळे. त्यामुळे तुम्हीही खूप शिका व मोठे व्हा. शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले. यावेळी व्यासपीठावर संवाद फौंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णा सुभाष साळुंखे, वकील मानसी गिरी, डॉ. आरती घुटे, शाळेच्या प्राध्यापक छाया निर्मळ, पल्लवी बांदिवडेकर व सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले उपस्थित होते. यावेळी संवाद फौंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंखे, डॉ. आरती घुटे यांनीही उपस्थित मुलींना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनी व व कचरा वेचक महिला-मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपच्या महिला शहर उपाध्यक्ष प्रिया जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेविका मंढारी यांनी केले.