शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्या 

शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्या 

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात यावी, अशीही मागणी ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कोणार्क देसाई यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचारी ८ ते १२ हजार एवढ्या नाममात्र वेतनात काम करत असून जे सध्याच्या  महागाईत खूप कमी आहे. अशात त्यांना महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांएवढेच काम करावे लागत असून त्या प्रमाणात योग्य वेतन व इतर सुविधाही मिळत नाहीत. कोविड-१९ सारख्या भयंकर साथरोगातही हे कर्मचारी निष्टेने काम  करत आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेने कोविड-१९ साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरु केली असून त्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील समान पदासाठी दरमहा १७ हजार रुपये वेतन निश्चित केले आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना अशाच कामासाठी ८ ते १२ हजार आणि नवीन भरती प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना १७ हजार रुपये वेतन म्हणजे हा एक प्रकारे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

दुसरे म्हणजे, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाऐवजी महापालिकेच्या दोन रुग्णालयात काम दिले जात असून ते चुकीचे आहे. देसाई यांनी ही बाब वारंवार लेखी स्वरूपात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या लक्षात आणू दिली असता त्यांना आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याचे कळविण्यात आले. दरम्यान, सदर निवेदनाची प्रत राज्याचे आरोग्यमंत्री, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, सहाय्यक कामगार आयुक्त, कल्याण यांनाही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.