वासिंदची वीज समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन द्या!

वासिंदची वीज समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन द्या!

वासिंद (प्रतिनिधी) : 
वासिंदची वीज समस्या सोडविण्यासाठी रखडलेले स्वतंत्र सबस्टेशन लवकर पूर्ण करा, असा आग्रह स्थानिक नागरिकांनी वासिंद येथे महावितरणच्या तक्रार निवारण सभेत धरला. वीज पुरवठ्यासंदर्भातील अनेक समस्या देखील वीज ग्राहकांनी याप्रसंगी मांडल्या.

वासिंद शहर व परिसरात निर्माण झालेली व नागरिकांना सातत्याने जाणवत असलेल्या वीज समस्येच्या निवारणासाठी ग्रामपंचायत हॉलमध्ये ग्राहक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा हे आवर्जून उपस्थित होते. शहापूर तालुक्यातील वासिंद येथे वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा त्यामुळे निर्माण होणारी पाणी समस्या, उशिरा मिळणारी वीज बिले, विजेचे जुने पोल, वीज तारांमधील अडचणी अशा अनेक प्रकारच्या समस्या नागरिकांनी यावेळी कथन केल्या. त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आश्वसन दिले. तेव्हा नागरिकांनी रखडलेले स्वतंत्र सबस्टेशन सुरू केल्यास वीज पुरवठ्याच्या बहुतांशी समस्या सुटतील, असे सांगितले. आमदार बरोरा यांनी या समस्यांचे सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, सहाय्यक अभियंता अमोल बिरे,  शिवसेनेचे जेष्ठ नेते विठ्ठल भेरे, तालुका प्रमुख मारुती धिर्डे, विभाग प्रमुख गुरुनाथ ठाकरे, शहरप्रमुख विकास शेलार, दता ठाकरे, सरपंच लता शिंगवे, महिला आघाडीच्या मिनल शेटे, ग्राम पंचायत सदस्या प्रेरणा गायकवाड, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे, मनसेचे अमोल बोराडे, बंडू शृंगारपूरे, बाळाराम तरणे, जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव, युवाध्यक्ष मोहन कंठे, संचालक अमोल तारमळे, अनिल मानिवडे, सुजाण वडके, सुभाष रोठे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.