केडीएमसीच्या अभय योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद 

केडीएमसीच्या अभय योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद 

कल्याण (प्रतिनिधी) :  कल्याण डोंबिवली महापालिकेने (केडीएमसी) मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या नागरिकांसाठी १५ आँक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी अभय योजना सुरू केली आहे. गेल्या चार दिवसात अभय योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करापोटी तब्बल १० कोटी ५८ लाख रूपये जमा झाल्याने या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या वतीने १५ आँक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० कालावधीपर्यंत मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांसाठी अभय योजना सुरू असुन अभय योजनेस मालमत्ता कर थकबाकी दारांचा प्रतिसाद लाभत आहे. गेल्या ४ दिवसात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या  मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांनी तब्बल १० कोटी ५८ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी १ कोटी १४ लाख रूपये, २६ नोव्हेंबर रोजी ३ कोटी ३१ लाख रूपये, २७ नोव्हेंबर रोजी २ कोटी ८२ लाख रूपये, २८ नोव्हेंबर रोजी ३ कोटी १ लाख रूपये  इतकी रक्कम  मालमत्ता करापोटी महापालिकेत जमा केली आहे.

नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू असलेल्या  अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी केले आहे. १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत लागू असलेल्या अभय योजना २०२० मध्ये संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराची संपूर्ण रक्कम तसेच व्याजाची २५ टक्के रक्कम एक रकमी भरल्यास ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे.