मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त कल्याणमध्ये भव्य पुस्तक प्रदर्शन

कल्याण (प्रतिनिधी) : मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवलीतील रसिक वाचकांसाठी दि.२० व २१ जानेवारी रोजी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आणि दि. २३ व २४ जानेवारी रोजी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ख्यातनाम प्रकाशनांच्या पुस्तकांचे सवलतीच्या दरात पुस्तक विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनात कल्याणमधील व डोंबिवलीमधील निवडक सार्वजनिक वाचनालयांतील दुर्मिळ पुस्तके वाचकांच्या अवलोकनासाठी या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. सदर प्रदर्शनात सुमारे १ ते दीड लाख पुस्तकांद्वारे कल्याण डोंबिवलीच्या वाचकांना पुस्तक प्रदर्शनातून अनोखी मेजवानी प्राप्त होणार आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार या पंधरवड्याची आखणी करण्यात आली आहे. या पंधरवड्यात दररोज संध्याकाळी सहा वाजता स्थानिक साहित्यिकांचे अनुभव कथन फेसबुक लाईव्ह स्वरुपात दाखविले जात आहे. महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना देखिल या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीकोनातून ‘कोविड-19 चा स्वानुभव’ या विषयावर महापालिका अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रजासत्ताक दिनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते रोख पुरस्कार व स्मृतीचिन्ह प्रदान केले जाणार आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाची सांगता दि. २८ जानेवारी रोजी महापालिका परिक्षेत्रातील विविध क्षेत्रात नामवंत व्यक्तिंच्या ऑनलाईन चर्चासत्राने होणार आहे. या चर्चासत्राच्या उद्देश विविध क्षेत्रातील यशस्वी, नामवंत व्यक्तिंच्या अनुभवातून उदयोन्मुख, होतकरु तरुण पिढीला मार्गदर्शन करणे हा राहील.