रत्नागिरी जिल्ह्यात बांबू लागवड करणाऱ्यांना ‘ग्रीन वर्ल्ड’चे सहाय्य 

रत्नागिरी जिल्ह्यात बांबू लागवड करणाऱ्यांना ‘ग्रीन वर्ल्ड’चे सहाय्य 

खेड (प्रतिनिधी) :
पारंपारिक बांबू ऐवजी टीश्यु कल्चर बांबूची लागवड केल्यास उसापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळेल. पारंपारिक ४ फुटाचा बांबू एक किलो भरतो, तर तोच टीश्यु कल्चर बांबू ४ किलो भरतो. त्यामुळे साहजिक उत्पन्न अनेक पटीने वाढते. बांबूपासून सीएनजी इंधन, वीज, कपडे, कागद अशी अनेक उत्पादने तयार करता येतात. त्यामुळे कोकणात बांबू लागवडीला प्राधान्य दिल्यास कोकणात समृद्धता येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोटे येथील ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू आंब्रे यांनी केले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आंब्रे पुढे म्हणाले की, यापूर्वी शासनाच्या सामाजिक वनीकरण योजने अंतर्गत हेक्टरला ४०० झाडे लागवड करण्यासाठी देण्यात येत होती. पण हेक्टरी झाडांचे असलेले हे प्रमाण पाहता ही योजना उपयोगाची नसल्याचे सबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिले. या योजने अंतर्गत बांबूची आमडस, भेलसई इत्यादी गावांमध्ये करण्यात आलेली लागवड कशी फोल ठरली ते संबंधितांच्या लक्षात आणून दिले. त्याऐवजी एका एकराला ४०० बांबूची रोपे लावण्यास परवानगी दिली तर एकरी १ लाखांचे उत्पन्न मिळेल हे लक्षात आणून दिल्यानंतर ते मान्य करीत शासनाने त्यांच्या मागणीला संमती दिली आहे. कोकणातील प्रत्येक गावातून पडीक जमिनीतून १ ते २ कोटी रुपयाची उलाढाल विषमुक्त शेतीतुन तयार करण्याचे ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशनचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येक गावातून १ ते २ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतीतून मिळाल्यास कोकणातील माणूस मुंबईला रोजगारासाठी जाणार नाही. येथेच शुद्ध वातावरणात राहता येईल. प्रत्येक गाव आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, असा विश्वास राजू आंब्रे यांनी बोलून दाखवला. ज्यांना बांबु लागवड ज्यांना करायची असेल अशा रत्नागिरीमधील खेड, चिपळुण, गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्यातील इच्छुकांनी ग्रीन वर्ल्ड फाउडेशन (लोटे) संस्थेशी ९५६१२१६६७७ / ९८२२१५८९५५ / ९२७३२९४१२८ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यासाठी १ झाडाला ५०७ रुपये मिळतील व ३ वर्षासाठी ५ एकरच्या आत जमिन असावी. यासाठी सातबारा व आठ ‘अ’, जॉबकार्ड नंबर, आधार कार्ड, नॅशनल बँक पासबुक, ग्राम पंचायत दाखला इत्यादी कागदपत्रे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंब्रे आणि त्यांचे साथी शेल्डीचे माजी सरपंच विलास आंब्रे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने बांबू लागवड कोकणात कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रित केले केले आहे. ग्रीन वर्ल्ड फाऊडेशन, लोटेच्या वतीने शेल्डी गाव सुंदर, नयनरम्य व पयर्टनातुन आर्थिक सपंन्न करण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे सुरक्षित करण्यात येत आहेत, रॉक गार्डन तयार होत आहे. शेल्डी गाव रोजगार निर्मितीचे सुंदर मॉडेल बनविण्यासाठी ग्रीन वर्ल्ड फाऊडेशन व शेल्डी ग्रामस्थ झटत असल्याचे आंब्रे यांनी आवर्जून सांगितले. पावसामुळे सध्या काम थांबवले असून उर्वरित काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच चुलीवरचे जेवण उपक्रमाला या वर्षापासून सुरुवात करीत असून सहा महिन्यात ते पूर्ण करू शेकडो लोकांना त्यातूनही रोजगार मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.