पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई (प्रतिनिधी) : 
गेल्या संपूर्ण वर्षात देशाच्या विविध पोलीस दलातील कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली. देशाच्या विविध पोलीस दलामधील वीरगती प्राप्त झालेल्या ३१ पोलीस अधिकारी आणि २६१ पोलीस अंमलदारांची नावे यावेळी वाचून दाखविण्यात आली.

नायगाव पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी राज्यपालांनी हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे निवेदन वाचून दाखवले. त्यानंतर त्यांनी शहिदांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पुष्पचक्र वाहिले.

कार्यक्रमाला विविध देशांचे राजनैयिक प्रतिनिधी तसेच पोलीस दलातील आजी व माजी ज्येष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.