रस्ते दुरुस्ती गुणवत्तापूर्ण न केल्यास ठेकेदारावर गुन्हा करण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा

रस्ते दुरुस्ती गुणवत्तापूर्ण न केल्यास ठेकेदारावर गुन्हा करण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा

ठाणे (प्रतिनिधी) : निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारांस नोटीस बजावण्यात आली असून रस्ते दुरूस्तूची कामे तात्काळ व गुणवत्तापूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करून कंपनीस काळ्या यादीत टाकण्याचा ईशारा देण्यात आला आहे. सदरची कारवाई महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

शुक्रवारी पालकमंत्री शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी केली असता कामे दर्जा राखून योग्य न झाल्याबाबत व नागरिकांची गैरसोय झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने निविदाकारांना तातडीने कामे करणेबाबत व त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित ठेकेदारास यापूर्वी केलेले काम योग्य दर्जाचे न झाल्याचे निदर्शनास आल्याने ठेकेदाराने केलेल्या व नादुरुस्त झालेल्या कामांचे देयक महापालिकेच्यावतीने अदा करण्यात येणार नसल्याचे  नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ठराविक वेळेत, काम पुर्ण केले नसल्याने निविदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये याचा खुलासा ३ दिवसात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहेत. तसेच सदर कामासोबतच या ३ दिवसाच्या कालावधीत  कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील देखील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य गुणवत्ता राखुन काम पुर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान सर्व कामे तात्काळ न केल्यास नागरिकांना गैरसोय निर्माण केल्याबाबत योग्य तो गुन्हा दाखल करून संस्थेस काळ्या यादीत टाकण्याचा ईशाराही महापालिकेने दिला आहे.