आंबिवली येथे रस्ता रुंदीकरणात शिवसेना शाखेवर हातोडा

आंबिवली येथे रस्ता रुंदीकरणात शिवसेना शाखेवर हातोडा

आंबिवली (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ८० फुटी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असल्याने मोहने येथील चौतीस वर्षांपूर्वी दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर महापालिकेने शनिवारी सायंकाळी उशिरा कारवाई केली.

मोहने परिसरात कुठल्याच राजकीय पक्षाचे कार्यालय त्या काळात नसतांना एकमेव शिवसेना शाखेचे कार्यालय येथे अस्तित्वात होते. मोहने गावच्या वेशीवर या वास्तूची अनेकांना आदरयुक्त भीती असायची. घरगुती भांडणे तसेच पोलिसांकडून होत असणारा त्रास किंवा अन्य कुठल्याही समस्या या शाखेत सोडविल्या जात असत. त्यामुळे ही शाखा अन्यायग्रस्तांनसाठी दिलासादायक ठरली होती. ३४ वर्षानंतर नागरी हिताच्या कामात या शाखा अडथळा ठरत असल्याने त्यावर हातोडा पडताना अनेक जुन्या शिवसैनिकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.