रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णालयांच्या समस्यांबाबत आरोग्यमंत्र्यांनी घेतली बैठक 

रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णालयांच्या समस्यांबाबत आरोग्यमंत्र्यांनी घेतली बैठक 

मुंबई (प्रतिनिधी) : 
राज्यातील रूग्णालये व आरोग्य केद्रांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने पदे भरून जनतेसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करण्यात यावी व रिक्तपदे भरती प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. विधानभवनात आरोग्यसेवा पुरविताना येणाऱ्या विविध समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रूग्णालयांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

शिंदे पुढे म्हणाले की, ज्या रूग्णालयांमध्ये पदे रिक्त आहेत त्या रूग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात यावीत. तसेच राज्याच्या ग्रामीण भागात तज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे डॉक्टरांना प्रति रूग्णामागे प्रोत्साहन निधीसारख्या सुविधा देण्यात याव्यात.

सोलापूर जिल्ह्यातील राज्य कामगार विमा रूग्णालयातील डॉक्टरांची  रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात यावीत. तसेच बाह्यरूग्ण विभाग त्वरीत कार्यरत करून कामगारांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात याव्या. रूग्णालयात आवश्यक सात प्रकारची वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामग्री पुरविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा तारळे येथे उपजिल्हा रूग्णालय व भुदरगड तालुक्यात ग्रामीण रूग्णालय मंजूर करण्यासाठी निवेदन दिले. त्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्यवर्धिनी केंद्र व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. असदर बैठकीला आ. प्रणिती शिंदे, आ. भास्कर जाधव, राजन साळवी, सदानंद चव्हाण, संजय कदम, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, अतिरिक्त संचालक डॉ. सतिश पवार आदी उपस्थित होते.