कोकण किनारपट्टीत धुवांधार पावसाचा अंदाज; 'रेड अलर्ट' जारी

कोकण किनारपट्टीत धुवांधार पावसाचा अंदाज; 'रेड अलर्ट' जारी

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत दाखल झालेला मान्सून आपलं रौद्ररूप दाखवत असतानाच आता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला बुधवारी काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चार दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यना, हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई, तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत बुधवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले. कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही, हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.