पोलिसाला अपघात होऊनही टिटवाळ्यातील रस्त्यांवर घोडे मोकाट

पोलिसाला अपघात होऊनही टिटवाळ्यातील रस्त्यांवर घोडे मोकाट

कल्याण (प्रतिनिधी) : टिटवाळा शहरात असंख्य घोडे रस्त्यावर मोकाट सोडून देण्यात आलेले असून त्यांच्या भरधाव दौडण्यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच गणेश मंदिर रस्त्यावर भरधाव दौडणाऱ्या एका घोड्याची दुचाकीला धडक लागून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतरही स्थानिक प्रशासनासह पोलीस प्रशासनाने या मोकाट घोड्यांना व त्यांच्या मालकांना लगाम लावण्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांवर मोकाट दौडणाऱ्या घोड्यांमुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

कोरोना काळात अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. असाच परिणाम शहरातील टांगा व्यवसायावर झाल्याने अनेक टांगा मालकांना घोड्यांना चारापाणी घालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे टांगा मालकांनी घोड्यांना मोकाट रस्त्यावर सोडून दिल्याचे बोलले जात आहे. अशा या मोकाट सोडून देण्यात आलेल्या घोड्यांची संख्या सुमारे १० ते १५ घरात असल्याचे नागरिक सांगत आहेत. भरगर्दीच्या वेळेतही हे घोडे रस्त्यांवर इकडेतिकडे फिरत, दौडत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. 

काही महिन्यांपूर्वीच गणेश मंदिर रस्त्यावर भरधाव दौडणाऱ्या एका घोड्याची दुचाकीला धडक लागून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतरही स्थानिक प्रशासनासह पोलीस प्रशासनाने या मोकाट घोड्यांना व त्यांच्या मालकांना लगाम लावण्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांवरील मोकाट दौडणाऱ्या घोड्यांमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त करीत आहेत. असा एखादा अपघात घडून जीवितहानी झाल्यास त्याला कोण जबाबदार असेल, असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.