रुग्णालय, डॉक्टर, औषध विक्रेत्यांना क्षयरुग्णांची नोंदणी बंधनकारक

रुग्णालय, डॉक्टर, औषध विक्रेत्यांना क्षयरुग्णांची नोंदणी बंधनकारक

ठाणे (प्रतिनिधी) : प्रत्येक क्षयरुग्णावर उपचार होऊन क्षयरोगाचा प्रसार रोखता यासाठी क्षयरुग्णांवर उपचार करणारी खाजगी रुग्णालये, डॉक्टर तसेच क्षयरोगावरील औषधे विकणाऱ्या औषध विक्रेत्यांना क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातंर्गत ही नोंदणी करावी लागणार आहे. प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी होऊन त्याच्यावर उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हा नोंदणीमागील उद्देश आहे. नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांमध्ये क्षयरोग निदान करणाऱ्या शहरातील  सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडीओलॉजी सुविधा असलेल्या संस्था, क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथीची सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, सर्व बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सुविधा, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट यांचा समावेश राहणार असून या सर्वांना नोंदणी बंधनकारक असणार आहे.

ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर्स, रुग्णालये, औषधविक्रेत रुग्णांची नोंदणी करणार नाहीत, अशा संस्था व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येऊन, भारतीय दंड विधान कलम २६९, २७० नुसार कारवाईसाठी पात्र राहतील. या कलमातंर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दोन वर्षापर्यत कारावास व दंडाची तरतूद आहे.

१ जानेवारी २०२१ पासून निदान झालेल्या, उपचार घेणाऱ्या, औषध घेणाऱ्या सर्व रुग्णांची नोदंणी ठाणे महापालिका क्षयरोग कार्यालयात करण्याचे आदेश देण्यात आले आहे. क्षयरुग्ण नोंदणीच्या विहीत नमुन्यातील माहिती क्षयरोग अधिकारी यांचेकडे दरमहा पाठविण्याबाबतचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर्स, रुग्णालये, औषध विक्रेते रुग्णांची नोंदणी केली नाही अशा संस्था, डॉक्टर्स यांना यापूर्वी ठाणे महानगरपालिका शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने पत्रव्यवहार करुन त्यांना समज देण्यात आली आहे.