कल्याण येथे जागरूक नागरिक संघटनेचे मानवी साखळी आंदोलन

कल्याण येथे  जागरूक नागरिक संघटनेचे मानवी साखळी आंदोलन

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महापालिकेत मूलभूत सुविधाच्या वानवा असल्याने तक्रारी करूनसुद्धा त्याकडे केले जाणारे दुर्लक्ष आणि एक खड्डा भरण्यासाठी महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या २० हजार रुपये खर्चाच्या निषेधार्थ  जागरूक सामाजिक संघटनेच्या वतीने कल्याण पश्चिमेतील बाजारपेठेत नुकतेच मानवी साखळी  तयार करून आंदोलन करण्यात आले .

कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक ते महंमदअली चौकापर्यत जागरुक नागरिक संघटना यांच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी मानवी साखळी करुन जनतेला जागरुक होण्याचे आवाहन केले. महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी तब्बल १९  कोटी खर्च करीत एक खड्डा भरण्यासाठी मुंबई महापालिकेलाही मागे टाकत २० हजार रुपये खर्च केल्याची माहिती, माहिती अधिकारांतून उघडकीस आली आहे. पाणी समस्या, कचरा व्यवस्थापन आणि डाम्पिंग ग्राउंड यांच्या वासाने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक प्रकल्प पूर्ण न होता नागरिकांना वेठीस धरले जात आहे, वाहतुकीचे प्रमुख रस्त्यावरील पूल अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अनेक वेळा तक्रारी अर्ज करून या समस्या सोडवल्या जात नाही. अधिकारीवर्ग आपल्याच कामात मश्गूळ असल्याने त्याबद्दल संताप व्यक्त करीत, तसेच नागरिकांत जनजागृती करण्यासाठी हातात फलक घेऊन सदरचे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासना विरोधात घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनात श्रीनिवास घाणेकर, योगेश दळवी आदींसह असंख्य कार्यकर्त्यानी सहभाग घेतला.