कल्याण येथे शिवसेना आयोजित रेशनकार्ड शिबिराचा शेकडो नागरिकांना लाभ

कल्याण येथे शिवसेना आयोजित रेशनकार्ड शिबिराचा शेकडो नागरिकांना लाभ

कल्याण  (प्रतिनिधी) : कल्याण रेल्वे स्थानका लगत शिवसेना, युवा सेना व शिवसमर्थ क्रिडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रेशनकार्ड शिबीराचे मंगळवारी आयोजन केले होते. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

शिवसमर्थ क्रिडा मंडळाच्या कार्यालयात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेविका अस्मिता मोरे, कल्याण युवा सेना अधिकारी अभिषेक मोरे, शाखाप्रमुख निलेश आत्माराम खेडेकर, शिवसमर्थ क्रिडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा ठाकरे आदी उपस्थित होते. मराठा सेनेचे प्रदेश संघटक रविंद्र कदम, परिवहन कामगार संघटनेचे पदाधिकारी अरविंद तांबे, प्रकाश जाधव यांच्यासारख्या असंख्य मान्यवरांनी शिबिराला भेट दिली. दिवसभर चाललेल्या या शिबिरात नवीन रेशनकार्ड, रेशनकार्डमध्ये दुरुस्ती, दुय्यम रेशनकार्ड, पत्ता दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करणे इत्यादी कामे करून देण्यात आली. दिवसभरात शेकडो नागरिकांनी शिबिरात येऊन त्यांची रेशनकार्डची कामे करून घेतली.

शिबिराबाबत माहिती देताना आयोजक शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी सांगितले की, जोशीबाग प्रभाग व परिसरात अनेक नागरिक बाहेरून नव्याने येऊन स्थायिक झाले असून त्यांना व इतर नागरिकांना रेशनकार्डची विविध कामे करण्यासाठी शिधावाटप कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यात त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यासाठी प्रभागातच रेशनकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना जेथल्या तेथे संपूर्ण माहिती देऊन तत्काळ त्यांची नवीन रेशनकार्ड, रेशनकार्डमध्ये दुरुस्ती, दुय्यम रेशनकार्ड, पत्ता दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करणे अशी कामे करून देण्यात आली.