... येथे सापडली शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे

... येथे सापडली शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण शहरात एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखी शेकडो बनावट कोरी निवडणूक मतदार ओळखपत्र मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकारी यांनी याबाबत कामेश मोरे नामक इसमाविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही ओळखपत्रे कशासाठी व कुठून आणली होती याचा तपास पोलीस करीत आहेत.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील माधव संसार’मधील फ्लॅट नंबर बी-२ मध्ये ही ओळखपत्रे आढळून आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नोव्हेंबर २०२० रोजी नगरसेवकांचे राजवट संपुष्टात आली असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. मात्र कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होण्याचीही शक्यता असून या दृष्टिकोनातून ही बनावट मतदार ओळखपत्र बनवली गेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदर इमारतीत राहणाऱ्या कामेश मोरे याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने हुंड्याची केस दाखल केली होती. या गुन्ह्यात कामेश याला कोर्टाने घरी न जाण्याच्या आणि पत्नीला त्रास न देण्याच्या अटीवर जामीन दिला होता. काही दिवसांपूर्वी कामेश याने आपल्या मुलींना फोन करून घरात असलेले कार्ड घ्यायला येत असल्याचे सांगितले. ही बाब त्याच्या पत्नीला समजताच तिने याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांना दिली. आकडे यांनी नायब तहसीलदार वर्षा थळकर यांना कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार नायब तहसीलदार थळकर यांनी नुकतीच कारवाई करत या घरातून सुमारे ४०० ते ५०० बनावट कोरे मतदार ओळखपत्र जप्त केले याप्रकरणी कामेश मोरे याच्या विरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली आहे.