कडोंमपाच्या कंत्राटी कामगारांची उपासमार

कडोंमपाच्या कंत्राटी कामगारांची उपासमार

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घन कचरा विभागात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या सुमारे १०० सफाई कामगार, वाहन चालकांना गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. परिणामी या कामगार कुटुंबांवर उपासमारिची वेळ आली आहे. अशातच तोंडावर आलेला गणेशोत्सव कसा साजरा करायचा या चिंतेने कामगार हवालदिल झाले आहेत.

महापालिकेच्या घनकचरा विभागातील काम करणाऱ्या आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्टमध्ये सफाई कामगार, वाहन चालक कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. आम्हाला वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांच्यापैकी काही कामगारांना एक महिन्याचे, काहींना दोन महिन्याचे तर काहींना तीन महिन्याचे वेतन मिळालेले नाही. वारंवार उद्भवणाऱ्या या परिस्थितीमुळे गुजराण करणे या कामगार कुटुंबांना जिकीरीचे झाले आहे. अखेरीस या कामगारांनी कामगार नेते तथा ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियनचे प्रदेश अध्यक्ष कोणार्क देसाई यांना भेटून सर्व परिस्थिती कथन केली. त्याची दखल घेत देसाई यांनी महापालिका आयुक्त, तसेच कल्याण येथील सहाय्यक कामगार आयुक्तांना पत्र देत त्यांचे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले आहे. याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढून सदर कामगारांना तातडीने वेतन देण्याची मागणी त्यांनी केली आहे.