आयएएस अधिकाऱ्याच्या धडाकेबाज कारवाईने कल्याणकर सुखावले !

आयएएस अधिकाऱ्याच्या धडाकेबाज कारवाईने कल्याणकर सुखावले !

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त म्हणून रुजू झालेले डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पदभार सांभाळताच बडे थकबाकीदार यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ते आवश्यकच होते. तसेच फेरीवालामुक्त स्काय वॉक, रस्त्यावरील बेवारस वाहनांवरील कारवाई, शहराचा कायापालट अशा धडाकेबाज कारवाईमुळे आयएएस अधिकारी काय करू शकतो याची चुणूक नागरिकांना बघायला मिळत आहे. आयुक्तांच्या कारवाईने कल्याणकर सुखावले आहेत.

ओपन लँडची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असून विकासक ती भरण्याची टाळाटाळ करताना दिसत होते, पण या सर्व बड्या थकबाकीदारांवर आतापर्यंत फारशी प्रभावी कारवाई पालिका प्रशासनाकडून होताना दिसत नव्हती. याशिवाय महापालिका क्षेत्रातील दुसरा ज्वलंत समस्या घनकचरा व्यवस्थापनाची दखल आयुक्तांनी पदभार सांभाळताच आधारवाडी क्षेपणभूमीला भेट देत घेतली. रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याची मोहीम त्यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने सुरु केली आहे. कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्काय वॉक अडवणाऱ्या फेरीवाल्यांना देखील डॉ. सूर्यवंशी यांनी तडाखा दिला आहे. तसेच शहराचा कायापालट करणारे अभियान देखील राबविण्यात येत आहे.

महापालिका प्रशासन सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प तयार करीत आहे. आयुक्तांचा पुढील वाटचालीचा दृष्टीकोन त्यावरून  स्पष्ट होईलच. आतापर्यंतचा अनुभव असा की, आयुक्तांनी आपले अंदाज व्यक्त केले तरी लोकप्रतिनिधी उत्पन्नाची बाजू पालिकेची क्षमता न बघता वाढवत व त्यानुसार खर्चाचे प्रमाणही वाढवत. या कार्यपद्धतीवर मात करणे हे नवीन आयुक्तांसमोर एक प्रकारचे आव्हानच आहे. 

महापालिकेची सर्वसाधारण सार्वत्रिक निवडणूक ७-८ महिन्यांवर आली असता डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती ही त्याच पार्श्वभूमीवर बघायला हवी. त्यामुळे त्यांच्या कामात शासकीय पातळीवरून ढवळाढवळ होणार नाही अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नगरसेवकांना देखील संयम पाळावा लागेल. महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना कार्यक्षम व कणखर आयुक्त पालिकेत आणला गेला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे कदाचित काही लोकप्रतिनिधी नाराज होण्याची शक्यता असली तरी सत्ताधारी पक्षाची जनमानसात मलिन झालेली प्रतिमा त्यामुळे उजळण्याची शक्यता आहेच व त्यासाठीच डॉ. सूर्यवंशी यांना येथे पाठवण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.

बेवारस-भंगार वाहनांची मुख्यमंत्र्यांनीही घेतली होती नोंद

कल्याण-डोंबिवली शहरात रस्त्याच्या कडेला उभ्या  असलेल्या बेवारस आणि भंगार गाड्यांमुळे  नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.  या वाहनांमुळे लहान मोठे अपघातही घडले आहे.  त्यातच  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनीही रस्त्याच्या सौंदर्यावर याचा परिणाम होत असल्याचे सांगत  रस्त्यावरील  भंगार वाहने हटवण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी तसेच रस्त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केडीएमसीचे नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या भंगार आणि बेवारस दुचाकी चारचाकी गाड्यांवर कारवाईचे आदेश दिले. आयुक्ताच्या आदेशानंतर महापालिका आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई सुरू केली आहे.

बेवारस, भंगार दुचाकी-चारचाकी वाहने डंम्‍पर व हायड्रोक्रेनमार्फत उचलून आधारवाडी परिसरातील भूखंडावर नेऊन ठेवण्‍यात आली. रस्‍त्‍यावर टाकून दिलेली बेवारस वाहने सोडविण्यासाठी सबंधित नागरिेकांकडून दंड वसूल करण्‍यात येत आहे. या कारवाईसाठी  वाहतूक विभागाचे सहा. पोलिस आयुक्‍त डी.बी. निघोट, पोलिस निरिक्षक वाहतूक सुखदेव पाटील यांचे सहकार्य लाभले. वाहतूक शाखेच्या मागणीनुसार महापालिकेने या कामाकरीता ५ डम्‍पर व ३ क्रेन महापालिकेतर्फे उपलब्‍ध करुन दिले आहेत. डोंबिवली येथेही बेवारस-भंगार वाहने उचलण्‍याची कार्यवाही करण्यात येत आहे. अशा बेवारस-भंगार वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होण्याचे प्रसंग उद्भवत असल्याने नागरिकांनाही त्याचा  त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या या कारवाईबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. शिवसेनेचे डोंबिवलीचे शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे यांनीही समाधान व्यक्त करीत दोन्ही विभागांचे अभिनंदन केले आहे.