अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मदत

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मदत

मुंबई (प्रतिनिधी)  : 
राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येणार असून पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार प्रशासन आणि संबंधित यंत्रणा क्षेत्रीयस्तरावर सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय जिथे कुठे यंत्रणा काही तांत्रिक कारणांमुळे पोहोचली नसेल, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो अपलोड केल्यास, ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच पीकनिहाय भरपाई निश्चित करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्यांनाही तत्काळ मदत करावी, त्यासाठी संबंधित विमा कंपन्यांना निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी क्षेत्रीयस्तरावर विविध यंत्रणांनी समन्वयाने पंचनामे करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले. त्यासाठी महसूल, कृषी, कृषी महाविद्यालये, पशुसंवर्धन अशा विविध यंत्रणातील मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यात येवून तातडीने पंचनामे करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी बाधित क्षेत्राचे पंचनामे झाले नाही त्या शेतकऱ्यांनी ग्राम किंवा तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्याला तातडीने कळवावे. सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्र्वस्त केले आहे.