वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड तातडीने सुरु करा

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड तातडीने सुरु करा

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीस कामाला सुरूवात झाली असून यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. हि वाहतूक कोंडी रेल्वेने बंद केलेले मुख्य तिकीट घरासमोरील व एस.टी. स्टॅण्ड समोरील होम फ्लॅटफॉर्म नं.१ येथील दोन रिक्षा स्टॅण्ड तात्पुरत्या स्वरूपात तातडीने सुरू करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेशन परिसरातील बंद रिक्षा स्टॅण्डची पाहणी केली.  

कल्याण स्टेशन परीसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीस उड्डाणपुलाच्या कामास सुरूवात झालेली आहे. या कामामुळे स्टेशन परीसरात प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुक नियोजन, उपाययोजना, निर्णय न घेतल्यास संपुर्ण वाहतुक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुककोंडीमुळे प्रवासी नागरीकांना अनेक समस्या व असुविधा तक्रारी निर्माण होतील. वाहतुक कोंडी विरहीत वाहतुक व्यवस्था याकरीता नियोजन व उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

या संदर्भात १२ ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन प्रबंधक कल्याण यांच्या दालनात रेल्वे डायरेक्टर, इतर अधिकारी रेल्वे पोलिस, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व वाहतुक पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या उपस्थितीत संयुक्तिक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सॅटीस काम दिलेल्या मुदतीत होण्यासाठी ववाहतुक व्यवस्था नियोजन याकरीता आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करणे, एकेरी वाहतुक व्यवस्था, नो एण्ट्री करणे, तसेच स्टेशन समोरील रिक्षांची गर्दी कमी करण्याकरीता रेल्वेने नियोजित मॉल प्रवाशी सोयीसुविधा प्रकल्प या करीता बंद केलेले दोन रिक्षा स्टॅण्ड सद्यस्थितीत रिकामी असलेली रेल्वे हद्दीतील जागा तात्पुरत्या स्वरूपात रिक्षा स्टॅण्ड करीता तातडीने दयावी अशी मागणी करण्यात आली.