ठाण्यात बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची अंमलबजावणी 

ठाण्यात बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची अंमलबजावणी 

ठाणे (प्रतिनिधी) : 
पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी खाडीकिनारी खारफुटी सफारी करणे, स्थावर मालमत्ताचे नियमन करून त्याचे डिजीटायझेशन करणे तसेच शहर विकास विभागामार्फत बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या आहेत. दरम्यान पुढील तीन महिन्यात शहरातील सार्वजनिक आणि सामुहिक शौचालयाचे अद्ययावतीकरण करण्याला प्राधान्य देताना त्यासाठी समान कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी घनकचरा विभागाला दिल्या.

 
यासंदर्भात ईवाय या सल्लागार संस्थेसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राजेद्र अहिवर आणि समीर उन्हाळे, ई्वायचे वरिष्ठ प्रबंधक रूचिर राज महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना आयुक्त जयस्वाल यांनी ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनारी मँग्रोज ट्रेलस सुरू करून पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्यान विभागाने अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर स्थावर मालमत्तांचे नियमन करून त्याचे डिजीटायझेशन करण्याबाबतही महापालिका आयुक्तांनी स्थावर मालमत्ता विभागास सूचना दिल्या. याबाबत मालमत्तांची, वर्गवारी, त्यांची करण्यात आलेली आकारणी, त्याचा कालावधी आदी सर्व सर्व माहिती संकलित करून स्थावर मालमत्ता विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी डिजीटायझेशन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
 
दरम्यान, महापालिकेच्या शहर विकास विभागाच्या माध्यमातून बाधकामासाठी परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची कशी अंमलबजावणी करता येईल यासाठी ईवाय या संस्थेने अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. महत्वाचे म्हणजे पुढील तीन महिन्यात शहरातील सर्व सार्वजनिक आणि सामुहिक शौचालये स्वच्छ आणि नीटनेटकी राहावीत यासाठी त्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी ईवाय या संस्थेने महापालिकेस कृती आराखडा तयार करून द्यावा अशा सूचना जयस्वाल यांनी दिल्या.