किमान वेतनासाठी केडीएमसीच्या आरोग्य अभियानातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात 

किमान वेतनासाठी केडीएमसीच्या आरोग्य अभियानातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात 

कल्याण (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून तुटपुंज्या वेतनात काम करणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) आरोग्य विभागातील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन प्रशासनाच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती चे प्रदेश अध्यक्ष कोणार्क देसाई यांनी दिली आहे. कोविड-19 विरोधातील लढाईतही अभियानातील कर्मचारी जिवावरची जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावीत असतानाही त्यांना आवश्यक सोयीसुविधा देखील मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत सुमारे पावणे दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन दिले जात आहे. वाढत्या महागाईत एवढ्या कमी पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत येथील हे कर्मचारी आहेत. असे असूनही कोविड-19 च्या प्रादुर्भाव असतानाही या काळातही हे कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावत आहेत. आपले वेतन वाढविण्यात यावे अशी या कर्मचाऱ्यांची गेल्या काही वर्षांपासूनची आग्रही मागणी आहे. मात्र प्रशासन याप्रकरणी टोलवाटोलवी करीत आले आहे.

याच दरम्यान, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असून त्यांना किमान वेतन देऊ केले आहे. याच पदांच्या समतुल्य असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना फारच तुटपुंजे वेतन मिळत आहे. या प्रकारामुळे अभियानातील कर्मचारी संतापले आहेत. त्यांनी ऑल इंडिया लेबर्स एम्प्लोइज युनियनच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष कोणार्क देसाई यांच्या पुढाकाराने दि. २६ जून रोजी काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र महापालिका प्रशासनाने येत्या काही दिवसात याप्रकरणी मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले असून पुढील २५ दिवसात महापालिकेने योग्य निर्णय न घेतल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार, असा इशारा देसाई यांनी आंदोलनाची भूमिका कायम असल्याचा इशारा दिला आहे.