... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी!

... या शहरात मिळणार पाच किलो प्लास्टिकवर मोफत पोळीभाजी!

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार ‘५ किलो प्लास्टिक द्या आणि पोळीभाजी मोफत घ्या’ ही अभिनव योजना महानगरपालिका आणि डोंबिवली येथील तृप्ती गृह उदयोग आणि सिध्दी वेस्ट टू ग्रीन लिमिटेड या एनजीओच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महापालिकेने दि. २५ मे २०२० पासून सुरु केलेल्या ‘शुन्य कचरा मोहिमेचा’ कचरा वर्गीकरण हा मुख्य गाभा आहे. नागरिकांकडून ओला कचरा वेगळा केला जातो, परंतू सुका कचरा एकत्रित स्वरुपात येत असल्यामुळे तो उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे सुका कचरा वेगवेगळया स्वरुपात संकलित करण्यासाठी महानगरपालिकेने प्रत्येक रविवारी विविध संकलन केंद्रावरती सुका कचरा संकलित करण्यास प्रारंभ केला आहे. या कच-यातील प्लास्टिक वेगळे करणे महत्वाचे आहे. प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून कचरा हे उत्पन्नाचे साधन झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या योजनेनुसार एखाद्या व्यक्तिने यापुढे ५ किलो प्लास्टिक महापालिकेच्या डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर सुका कचरा संकलन केंद्रावर जमा केल्यास त्यास पोळीभाजी या आहाराचे कुपन उपलब्ध होणार आहे. ते कुपन तृप्ती गृह उदयोग येथे जमा केल्यावर सबंधीतांस विनाशुल्क पोळीभाजी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे व उप अभियंता मिलींद गायकवाड हे विशेष प्रयत्नशील आहेत. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व महापालिकेच्या शुन्य कचरा मोहिमेस सहकार्य करावे, तसेच प्लास्टिक कच-यामध्ये टाकू नये, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.