कोणत्या मतदारसंघांमध्ये आहे राष्ट्रवादी-मनसेची छुपी आघाडी ?

कोणत्या मतदारसंघांमध्ये  आहे राष्ट्रवादी-मनसेची छुपी आघाडी ?

कल्याण (प्रतिनिधी) :
ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-मनसेने छुपी आघाडी केल्याचे समोर आले आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचा प्रबळ उमेदवार असल्याने तेथे राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिला नाही तर, कल्याण पूर्व मतदारसंघात उमेदवार असतानाही तेथील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपा पाठींबा देण्यासाठी मनसेने आपला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

निवडणुकीपूर्वी मनसे-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करणार असा एक अंदाज वर्तविला जात होता. प्रत्यक्षात तसे न घडता मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरली. याच पार्श्वभूमीवर ‘दबंग’ या नावाने ओळखले जाणारे व कल्याण पूर्वेतील आपली कारकीर्द गाजवलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जगदीश लोहारकर यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्याची तयारी मनसेने केल्याची जोरदार चर्चा होती. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्याला दुजोराही दिला जात होता. मात्र याच काळात दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यानुसार कल्याण ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादीने मनसेचे राजू पाटील यांना, तर पूर्वमध्ये मनसेने राष्ट्रवादीच्या प्रकाश तरे यांना मदत करण्याचा निर्णय झाला आणि अशाप्रकारे या दोन विधानसभा मतदारसंघात या पक्षांची छुपी आघाडी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे..

२००९ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश रतन पाटील निवडून आले होते. २०१४ ला हा मतदारसंघ मनसेच्या हातून निसटला. त्यामुळे यंदा या मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी मनसेने पक्षाचे नेते प्रमोद (राजू) पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश तरे यांनी काही दिवस आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीने त्यांना कल्याण पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवले. २००९ मध्ये पूर्वेतून पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून येताना गणपत गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला समर्थन दिले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपला साथ दिली. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आग्रहही होताच.