गणेशोत्सवात कोकणातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश

गणेशोत्सवात कोकणातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) :
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई गोवा महामार्ग तसेच पुणे व कोल्हापूरवरून जाणाऱ्या मार्गांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. या मार्गावर वाहनांमुळे वाहतूक थांबणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने संपर्कात रहावे. तसेच स्थानिक पोलिसांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश महामार्ग पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनय कोरगावकर यांनी गुरुवारी येथे दिले.

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज विविध यंत्रणांची आढावा बैठक श्री. कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी विविध सूचना दिल्या. वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) विजय पाटील, पोलीस अधीक्षक संजय शिंदे, दिगंबर प्रधान, मिलिंद मोहिते, सुनील लोखंडे यांच्यासह रायगड, पुणे, सातारा येथील पोलीस, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ आदी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच कोल्हापूर, पुणे व पालीमार्गे जाता येते. या मार्गावर विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. मुंबई -गोवा महामार्गावर ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, तेथे विशेष लक्ष द्यावे व त्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करावी. या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने चालते. त्यामुळे या रस्त्यांवरील खड्डे या महिनाअखेरपर्यंत बुजविण्यात यावेत. तसेच या मार्गावर दि. २९ ते ३१ ऑगस्ट या काळात चोवीस तास खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक सामग्रीसह मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

कोरगावकर यावेळी पुढे म्हणाले की, सध्या पाऊस सुरू असल्याने खड्डे बुजविण्यात अडचणी येत असल्या तरी पाऊस कमी झाल्यावर हे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसात कोकणात जाणारी गर्दी पाहता सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी.