२७ गावातील अवाजवी मालमत्ता कर रद्द न केल्यास तीव्र आंदोलन- आ. गायकवाड

२७ गावातील अवाजवी मालमत्ता कर रद्द न केल्यास तीव्र आंदोलन- आ. गायकवाड

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावातील मालमत्तेवर सरसकट लादलेला मालमत्ता कर हा अवाजवी असल्यामुळे रद्द करावा अशी मागणी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

आपल्या पत्रात गायकवाड यांनी म्ह्हातले आहे की, २७ गावात कर आकारणी करताना पालिकेने चालू रेडीरेकनर प्रमाणे सरसकट व अवाजवी दहापटीने केली आहे, ती शहरी भागाप्रमाणे आहे. वास्तविक पाहता ही गावे प्रथम २०१५ मध्ये महापालिकेत आली तरीही तेथील घरे पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. सदर पत्रात पुढे म्हटले आहे की, महापालिकेतून गावे वगळल्यानंतर ग्राम पंचायतीच्या नियमानुसार कर भरला जात होता. परंतु २०१५ मध्ये पुन्हा ती गावे महापालिकेत आली व ग्राम पंचायतीतील सर्व रेकॉर्ड महापालिकेकडे आले आहे. त्यानुसार महापालिकेने कर लावणे आवश्यक होते. परंतु महापालिकेने तसे न करता जुन्या मालमत्तेवर चालू बाजारमूल्य दराने सरसकट कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांवर जड कारचा बोजा टाकण्यात आला आहे.

२७ गावात मुलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. याकडे लक्ष वेधत आमदार गायकवाड पुढे म्हणतात, सोयीसुविधा नसताना करामध्ये वाढ करणे हे अन्यायकारक आहे. यामुळे २७ गावातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. २७ गावातील अवाजवी कर रद्द करण्यासाठी महापालिकेच्या दि. १९ एप्रिल १९१९ च्या सर्वसाधारण सभेतही ठराव मंजूर केला आहे. याचा उल्लेख करत आ. गायकवाड यांनी असा इशारा दिला आहे जर अवाजवी कर रद्द झाला नाही तर याचा उद्रेक केव्हाही होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

आमदार गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांनाही दि. ७ जानेवारीला पत्र पाठवून २७ गावातील अवाजवी मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी करत, हा अवाजवी कर महापालिकेने रद्द न केल्यास महापालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील, असा इशारा दिला आहे.