धीरेश हरड यांना इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्कार प्रदान

धीरेश हरड यांना इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्कार प्रदान

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते धीरेश हरड यांना इंदोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाणे-पालघर जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी हरड यांचे एकमेव नामांकन प्राप्त झाले होते.

नॅशनल अँटी हॅरेसमेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून देशभरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिष्ठेचा इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड देऊन गौरविले जाते. यंदा या पुरस्कारासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातून हरड यांचे एकमेव नामांकन संस्थेला प्राप्त झाले होते. नुकत्याच इंदोर येथे झालेल्या भव्य पुरस्कार प्रदान सोहोळ्यात पद्मश्री विजयकुमार शहा, सिनेअभिनेत्री सुश्मिता मुखर्जी यांच्या हस्ते धीरेश हरड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या पुरस्काराला उत्तर देताना हरड यांनी आजोबा कै. शंकर पांगो शिंदे आणि वडील पांडुरंग हरड (गुरुजी) यांच्याकडून आपण सामाजिक कार्याची प्रेरणा घेतल्याचे आवर्जून सांगितले.

धीरेश कुटुंबीय हे व्यावसायिक कारणामुळे कल्याणमधील उंबर्डे गावातील श्री कॉम्प्लेक्स येथे स्थायिक झाले. ते मुळचे लगतच्या मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील असून त्यांचे वडिल पांडुरंग हेमा हरड देखील सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत असल्याने पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. त्यांनी शंभर पेक्षा अधिक नववधुंचे कन्यादान केले आहे. धीरेश यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविला असून त्यांनीही शंभर पेक्षा अधिक नववधुंचे कन्यादान केले आहे. नववधूला संसारोपयोगी भांडीकुंडी व इतर साहित्य ते स्वखर्चाने देतात. त्यांनी कल्याण, शहापूर व मुरबाड तालूक्यातील मुलींचे विवाहात कन्यादान करीत एक आगळीवेगळी समाजसेवा चालवली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने शहरातील भुकेल्यांना अन्नदान, विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत, मुलांसाठी गायन-नृत्याच्या स्पर्धांचे आयोजन, गरजू शेकडो महिला-युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण आदी माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक कार्य अविरत सुरु ठेवले आहे. 

आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सांगताना धीरेश हरड यांनी, हा सन्मान म्हणजे आपण आनेक वर्षापासुन गोरगरीबाचे अश्रु पुसले-साठवले, तयाचे आज मोती मणिके हिरे झाले व सामाजिक कार्याची पोच पावती मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या सामाजिक कामात त्यांच्या मुली कु. दिव्या आणि कु. अंकिता यांचेही सहकार्य मिळत असल्याचे आवर्जून सांगताना धीरेश यांनी आपल्या मित्रमंडळींकडून सामाजिक कार्यासाठी मला नेहेमी मोलाची साथ मिळत असल्याचेही सांगितले. या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.