ओळख शिवधर्म गाथेची... 

ओळख शिवधर्म गाथेची... 
  • धर्माच्या नावाखाली जगभरात चाललेली 'हिंसा’ लक्षात घेता 'धर्मासाठी माणूस' की 'माणसासाठी धर्म यावर सखोल चर्चा जगभरातून व्हायला हवी असे वाटते. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ असे कार्ल मार्क्सने का म्हटल होते, हे धर्माची नशा करणाऱ्या हिंस्त्र श्वापदाकडे पाहिले की लक्षात येते. भारतासारख्या देशात तर धर्म ही सत्ताप्राप्तीची किल्ली आहे असे अनेक राजकीय स्थित्यंतराकडे बघताना दिसून येते. सत्ता हेच अंतिम ध्येय आणि धर्म असणाऱ्या राजकारण्यांनी देशभरात धर्मद्वेष पसरवून नव्या पिढीला सांप्रदायिकतेकडे, कट्टरवादाकडे वळवले. कोणताही धर्म हिंसा शिकवत नसतांना, हिंसेचे समर्थन करत नसताना- तर केवळ मानवतावादी दृष्टिकोनाची शिकवण देत असताना जगभरात धर्माच्या नावावर 'आगडोंब' उसकत राहतो? हा प्रश्न संवेदनशील मनाला नेहमीच त्रास देतो. 

{शिवधर्माच्या स्थापना दिनानिमित्त (दि. २४ सप्टेंबर) त्याविषयी माहितीपर लेख}

अलिकडच्या काळात तर अनेक ठिकाणी माणसांनी धर्म नाकारून ‘मानवते’ची वाट धरली आहे. अर्थात धर्माची वाट म्हणजे मानवतेची वाट नाही असे नाही. आपला धर्म हाच कसा इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याच्या शर्यतीत आपण सर्वच टोकाच्या धार्मीक कट्टरतेकडे वाटचाल करतो आहोत. धर्म ही एक जगण्याची रीत आहे, पद्धत आहे आणि त्यात काळानुसार काही बदल होक शकतात. बदल केले पाहिजेत, हे मान्य न करता आपण सर्वच- सगळ्याच धर्मातले लोक एका रुढीवादी, पारंपारीक, सनातनी विचारधारेला चिटकून बसलो आहोत. त्यात होणाऱ्या बदलाची भाषा, चिकित्सा, पुढारलेपण आपल्याला मान्य होताना दिसून येत नाही. पण ते तसे झाले नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आपला धार्मिक कट्टरतावाद हानिकारक ठरेल. यातून मार्ग काढण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयत्न होतानाही दिसतात. धर्म परिषदा, धर्म नाकारणे, धर्म बदलणे किंवा वेगळ्या नव्या विचारधारेवर आधारित धर्माची संकल्पना मांडणे इत्यादी अनेक गोष्टी आपल्या सभोवताली घडत असतात.

याच संदर्भाने महाराष्ट्रात १२ जानेवारी २००५ रोजी झालेली शिवधर्माची स्थापना समजून घेणे, अभ्यासाने गरजेचे आहे. प्रत्येक धर्माचा एक ‘धर्मग्रथ’ असतो, त्यात त्या धर्मातील लोकांनी कशाप्रकारे आचरण करावे यासबंधी माहिती असते. सबंधित धर्माचे धार्मिक विधी असतात. त्याचप्रमाणे ‘शिवधर्म गाथा’ हे शिवधर्म समजून घेण्यासाठीचा, अभ्यासण्यासाठी महत्वाचा ग्रंथ आहे. अनेक विषयांवरील चर्चा, बैठका, परिषदा झाल्यानंतर विद्याविशारद, शास्त्राचे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रंथाची निर्मिती झाली. धर्म असावा की, नसावा इथपासून ते शिवधर्म का? व काय आहे? यासबंधी महत्वपूर्ण बाबी या ग्रंथात नमूद केलेल्या आहेत. बहुजन समाजाचे ऐतिहासिक दाखले देत शिवधर्मात ‘शिव तत्व’ हेच शिवधर्माचे एकमेव अधिष्ठान मानले गेले आहे.

मनाला प्रसन्न करणारे, कल्याणकारक, प्रत्येकाला स्वतःच्या विविध क्षमतांचे भान देणारे, आपल्या क्षमता साकारण्याचे मार्ग दाखविणारे, प्रत्येकाला इतर मानवांशी आणि मानवेतर अशा सर्व चराचर सृष्टीशी निकोप रितीने जोडणारे आणि आनंददायक असे जे सत्यस्वरूप सुंदर तत्व, ते 'शिव' होय. मानवी जीवनात जे जे उत्तम उदात्त, निकोप, न्यायाचे, माणुसकीचे आणि मानवाच्या सर्व अंतःशक्ती विधायक मार्गाने फुलवणारे असे असते, ते ते सगळे 'शिव' या संकल्पनेत अंतर्भूत होते. शिवधर्मासंबंधी शिवधर्म गाथेत केलेली ही मांडणी म्हणजे शिवधर्माचा सार म्हणता येईल. पृथ्वीला आहे त्यापेक्षा सुंदर बनवण्यासाठी जगभरात धर्माच्या नावावर चाललेला हिंसाचार थांबवण्यासाठी व मानवतेचे मूल्य प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी शिवधर्माचा हा विचार अतिशय महत्वाचा आहे. शिवधर्माचा विचार ही काळाची गरज तर आहेच, परंतु आपल्याला आपल्या गौरवशाली ऐतिहासीक वारशाकडे घेवून जाणारा रस्ता आहे. एक अभ्यासक म्हणून धर्मचिकीत्सक म्हणून किंवा आपल्या रोजच्या जगण्यातील धर्माचा वाढता प्रभाव बघता आपण शिवधर्म समजून घ्यायला हरकत नाही. एक साधा वाचक म्हणून देखील 'शिवधर्म गाथा’ वाचनीय आहे, धर्मासंबंधीच्या अनेक महत्वाच्या संकल्पनांचा दस्ताऐवज आहे- जो वाचलाच पाहिजे.
---
लेखक: प्रा. गंगाधर सोळुंके, 
(विचारवंत व अभ्यासक)