संकटात भरमसाठ वीज बिले धाडणारे हे सरकार की, सावकार? 

संकटात भरमसाठ वीज बिले धाडणारे हे सरकार की, सावकार? 

कल्याण (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले माफ करण्याऐवजी घरगुती ग्राहकांना वाढीव वीज बिले देणे, बंद असलेल्या दुकाने-आस्थापनांना बिले पाठवणे व वीज गळतीचा भार जनतेच्या माथी मारणे आदी मुद्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीचे लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महावितरणच्या कल्याण परिमंडळाच्या कल्याण पश्चिमेतील ‘तेजश्री’ कार्यालयावर धडक दिली.

यावेळी आपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता राठोड यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी राज्य शासनाकडे आपचे निवेदन पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांसमोर अॅड. धनंजय जोगदंड यांनी आपली भूमिका मांडली. लॉकडाऊन काळात दुकाने व उद्योग-वाणिज्य आस्थापना बंद असतानाही त्यांना महावितरणकडून जादा रक्कमेची वीज बिले देण्यात आली. घरगुती वीज ग्राहकांनाही नियमित बिलांपेक्षा वाढीव बिले देण्यात आली आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच हतबल झालेल्या, पिचलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी वाढीव बिलांच्या

माध्यमातून अधिकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. संकटकाळात जनतेला दिलासा देण्याऐवजी भरमसाठ वीज बिले धाडणारे हे सरकार आहे की, सावकार आहे, असा सवाल अॅड. धनंजय जोगदंड यांनी यावेळी केला.

वीज चोरी व गळती रोखण्यात अपयशी ठरलेले महावितरणचे प्रशासन या वीज गळतीची भरपाई प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्या वीज ग्राहकांकडून करीत असेल तर ते चुकीचे आहे, असे रविंद्र केदारे यावेळी म्हणाले. यावेळी राजेश शेलार, राजू पांडे, निलेश व्यवहारे, कल्पेश आहेर, राजू कातकडे, सिद्धार्थ गायकवाड, हमजा हुसैन, सुरज मिश्रा, सागर खांडे, रुपेश चव्हाण, कौशिक काळे, तेजस नाईक, युवराज मोहिते, गणेश आव्हाड, उमेश कांबळे, नागेश मिश्रा, निलेश गवई, बाळा नरवडे, सिद्धांत गायकवाड, शफिक शेख, आमीर बेग, संदीप नाईक, माधवी सावंत, निलिमा व्यवहारे आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रात कोरोना महामारी दरम्यान आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेचे मार्च ते जून २०२० या चार महिन्यांचे प्रत्येकी २०० युनिट प्रती महीना इतके विजबिल माफ करावे यासाठी आम आदमी पार्टीने ३ जून २०२० रोजी देखील राज्यभर आंदोलन केले होते.