पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणे योग्य नाही- आ. राजू पाटील

पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणे योग्य नाही- आ. राजू पाटील

कल्याण (प्रतिनिधी) : भारत-पाक क्रिकेट सामन्या विषयी भूमिका मांडताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी सांगितले की, देशाचे सैनिक धारातीर्थी पडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तान सोबत क्रिकेटचे सामने खेळणे योग्य नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली असून त्यांचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे, असा सवाल पाटील यांनी केला. प्रत्येक भारतीय नागरीकाला वाटते की भारताने पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये, असेही ते म्हणाले.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील तीन प्रभागांत विकासकामांचे भूमिपूजन  मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या आमदार निधीतून १ कोटी ८० लाखांच्या कामांना गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. कल्याण ग्रामीण मधील लोकग्राम, मेट्रोमॉल, नेतिवली टेकडी, कचोरे या प्रभागांत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी राजू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. विकासकामांच्या गुणवत्तेबाबत लोकांचा रोष झाला कि कोणाला तरी निलंबित करायचं, पुन्हा त्याला कामावर घ्यायचे व आपले काम पुन्हा सुरू करायचे. मात्र संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करायची नाही अशी या शिवसेनेची भूमिका असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला. त्याचप्रमाणे कल्याणच्या ऐतिहासिक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला केंद्र यासारख्या अनेक वास्तु आहेत, ज्या बीओटी तत्त्वावर घेतल्या  आहेत मात्र त्यांचा कुठलाही उपयोग होत नाही. याचा अर्थ बीओटी तत्त्वावर घ्यावे आणि पीपीपी म्हणजे खा खा खा धंदे करण्याचं काम सत्ताधारी शिवसेना करत असल्याची टीका राजू पाटील यांनी केली.