कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर 'जलाभिषेक'

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर 'जलाभिषेक'

कल्याण ( प्रतिनिधी) : 
कल्याण पूर्वेतील विजयनगर चौक, काटेमानवली येथील लोकगायक प्रल्हाद शिंदे उड्डाणपुला खालील रस्त्यालगत पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. त्याकडे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचारी लक्ष देत नसल्याने महापालिका प्रशासनाने रस्त्यावर पाण्याचा अभिषेक करीत आहे का, असा संतप्त सवाल करीत आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आजही अनेक भागाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागते. दुसरीकडे पाणी गळती रोखण्याकरिता महापालिका प्रशासन कोणत्याही हालचाली करीत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी जमिनीवर अथवा जमिनीतून जाणाऱ्या पाईप लाईनमधून पाणी गळती होत असते. मात्र ही पाणी गळती रोखण्यात महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरत असल्याची भावना जोगदंड यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकार प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला २० हजार लिटर पाणी मोफत देत आहे आणि आपली केडिएमसी पाणी फुकट घालवत आहे, हे कल्याण डोंबिवलीकरांचे दुर्दैवच म्हणावे लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी पाणी गळती आणि पाणी चोरी रोखण्यासाठी रस्त्यावर उतरावे आणि महापालिकेचे होणारे नुकसान टाळून जनतेला पुरेसा पाणी पुरवठा करावा अशी मागणी करीत असतानाच  अॅड. जोगदंड यांनी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारे लोकप्रतिनिधीं तर याबाबत उदासीनच असल्याची तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कल्याण पूर्वेतील विजयनगर चौक, काटेमानवली येथील लोकगायक प्रल्हाद शिंदे उड्डाणपुला खालील रस्त्यालगत फुटलेल्या पाईपलाईनचे व्हिडीओ त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत.