राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जयंत पाटील कल्याणला येणार

राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जयंत पाटील कल्याणला येणार

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी पार्टीच्या जास्तीत जास्त यशासाठी आणि पक्ष बांधणीसाठी एकत्र येऊया, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौका नजीक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यालय सुरु करण्यात आले असून या कार्यालयाच्या पूजना प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, राष्ट्रवादी पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष  आर. एन. यादव, राष्ट्रवादी कल्याण पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष ऍड. प्रल्हाद भिलारे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची शिस्तबद्ध संघटना प्रबळ करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीमध्ये विविध १९ सेल असून या सर्वाना एकत्र बसून काम करणे आवश्यक असून त्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या माळेला जिल्हा कार्यालयाचे पूजन केले असून लवकरच या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.