रस्त्यावरील खड्ड्यांवरून कल्याण डोंबिवलीची महासभा तहकुब

रस्त्यावरील खड्ड्यांवरून कल्याण डोंबिवलीची महासभा तहकुब

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी मांडलेली सभा तहकुबी सूचना प्रथम फेटाळणाऱ्या पीठासीन अधिकारी विनिता राणे यांना नंतर मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाच मिनिटांसाठी महासभा तहकूब करावी लागली.

सभा तहकुबीवर चर्चा सुरु करताना प्रकाश भोईर म्हणाले की, खड्डे बुजवण्यावर महापालिकेने १७ कोटी खर्च केले पण खड्डे तसेच आहेत. भाजपचे राजन सामंत, मोरेश्वर भोईर यांनी प्रशासनावर टीका करीत ठेकेदारांना देयके देऊ नयेत अशी मागणी केली. यावेळी सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी पावसाळ्यात एक कंपनी खड्डे खोदत असल्याचे सांगत ती परवानगी कशी दिली अशी विचारणाही केली. मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी खड्डे भरण्यासाठी कायमस्वरूपी उपाय का केले जात नाही अशी विचारणा करीत संबंधितांवर का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न केला. या परिस्थितीला शासनच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

यावेळी शहर अभियंता सपना कोळी यांनी मान्य केले की, पावसामुळे खड्डे भरण्याला विलंब झाला. यावर्षी मागील वर्षापेक्षा ८० टक्के पाऊस झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ठेकेदारांना देयके दिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी शासनाच्या निषेधार्थ सभा तहकूब करण्याची मागणी केली.

महापौरांनी प्रथम सभा तहकुबी घेण्याची विनंती भोईर यांना केली. पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे सभा तहकुबी फेटाळल्याचे निर्देश दिले. तसेच त्वरित खड्डे भरण्याचे प्रशासनालाही निर्देश दिले. यावर मनसेच्या गटनेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत तहकुबी फेटाळण्याचे कारण विचारले व मतदान घेण्याची मागणी केली. अखेर पीठासीन अधिकाऱ्यांनी काही वेळासाठी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे आदेश दिले.