विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण राष्ट्रवादीतील इच्छुकांची दावेदारी  

विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण राष्ट्रवादीतील इच्छुकांची दावेदारी  

कल्याण (प्रतिनिधी) :
आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याला कल्याण जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या चार विधानसभा मतदारसंघासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज पक्षाकडे केले आहेत. त्यामध्ये अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनीही उमेदवारीसाठी दावेदारी सांगितली आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वंडार पाटील, कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले बाबाजी पाटील यांच्याव्यतिरिक्त अर्जुनबुआ चौधरी यांनीही तिकीटाची मागणी केली आहे. याशिवाय कल्याण जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सुधीर पाटील यांनीही अर्ज केल्याचे समजते आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, अॅड. प्रल्हाद भिलारे, सुभाष गायकवाड, संदीप देसाई व वसंत पाटील यांच्यासह ८-९ इच्छुकांनी तिकीटाची मागणी केली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघासाठी वर्षा कळके, रमेश साळवे, जानू वाघमारे, काशिनाथ पाटील व अश्विनी धुमाळ यांनी उमेदवारी मागितली आहे. काही कार्यकर्ते कल्याण पूर्वमधून आमदार डॉ. जगन्नाथ शिंदे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. डोंबिवली मतदारसंघातून सुरेंद्र म्हात्रे व युवराज पवार यांनी उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. राष्ट्रवादीची कॉंग्रेसशी आघाडी होण्याची असलेली शक्यता पाहता कल्याण जिल्ह्यातील चार पैकी कल्याण पूर्व आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याने तेथील राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या आकांक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.