शिक्षणात कल्याण पॅटर्नची ओळख निर्माण झाली - खा. कपिल पाटील

शिक्षणात कल्याण पॅटर्नची ओळख निर्माण झाली - खा. कपिल पाटील

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणची ओळख ऐतिहासिक आहे, मात्र आता माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे लवकरच कल्याण देखील शिक्षणाची पंढरी होणार असून कल्याण पॅटर्न निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन खासदार कपिल पाटील यांनी केले. माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार यांनी ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट व सीईटी प्रवेश परीक्षा ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या उपक्रमाचे उदघाटन खासदार कपिल पाटील यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते.

कल्याणमधील अचिवर्स महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे, आचिवर्स शाळा व महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ महेश भिवंडीकर, स्थानिक नगरसेवक सचिन खेमा, सदा कोकणे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी या उपक्रमाची उपयुक्तता सांगून प्रवेश परीक्षेच्या सरावासोबतच विद्यार्थ्यांना मिळणारे मार्क्स, त्याने केलेल्या चुका त्याची कारणे लगेच दिसणार असल्याचे सांगितले.

या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील विविध कॉलेज, क्लास मधील तसेच कल्याण मध्ये राहणारे व इतरत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी कोणतेही शुल्क न देता मोफत या टेस्ट सिरीजचा लाभ घेतील तसेच या सिरीजमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकरणांवर आधारित टेस्ट उपलब्ध होणार असून विविध विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शनही लाभणार असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. या साठी विद्यार्थ्यांनी www.narendrapawar.com  या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन पवार यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री अकुल तर आभार प्रदर्शन अनंत किनगे यांनी केले. या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख महेश सावंत, शिक्षण क्रांती संघटनेचे कल्याण डोंबिवली अध्यक्ष गजानन पाटील, ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष शेखर कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.