कल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला गौरव

कल्याण: सफाई कामगारांचा सामाजिक संस्थांनी केला गौरव

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पूर्व येथील सहयोग सामाजिक संस्था व तिसाई क्रीडा मंडळ या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्व भागातील सुमारे ५० सफाई कामगारांसाठी स्टीमर (वाफ घेण्याची मशीन) देण्यात आले. तसेच सर्व सफाई कामगारांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देत त्यांच्या कर्तव्य तत्परतेचा गौरव करण्यात आला.

कल्याण पूर्व येथील महापलिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, प्रभाग क्र. ९१ चे नगरसेवक निलेश शिंदे, ‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, ‘जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील, प्रमुख स्वछता आरोग्य निरीक्षक लखीचंद पाटील, दिगुलकर, तिसाई मित्र मंडळाचे अध्यक्ष विष्णू जयराम गायकवाड, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले आदी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना रामदास कोकरे आपल्या भाषणात म्हणाले की, माझ्या सफाई कामगारांनी खरोखर साथरोगाच्या काळात जे काम केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी सदैव त्यांच्या सोबत आहे.

सहयोग संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी आपले प्रास्ताविक करताना म्हटले की, जसे सीमेवर जवान  शत्रूपासून देशाचे रक्षण करतो तसे आरोग्य विभागातील लोकांनी कोरोनासारख्या महामारीमध्ये लोकांचे रक्षण करीत आहेत. यावेळी कोकरे यांच्या हस्ते सफाई कामगारांसाठी स्टीमर देण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्धा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.