कुठे उभारला गेला राममंदिर निर्माणाचा देखावा ?

कुठे उभारला गेला राममंदिर निर्माणाचा देखावा ?

कल्याण (प्रतिनिधी) :
भाजप-शिवसेनेच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणात राम मंदिर निर्माणाचा देखावा साकारण्यात आला आहे. कल्याणमधील शिवसमर्थ मित्र मंडळाने साकारलेला हा देखावा कल्याणकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजप-सेनेच्या अजेंड्यावरील काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, राम मंदिर उभारणी हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. त्यापैकी काश्मीरमधील ३७० कलम भाजपने नुकतेच काढून टाकले. मधल्या काळात भाजप-शिवसेनेमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यातून राम मंदिर बांधण्यासाठी भाजपपेक्षा शिवसेना अधिक आग्रही असल्याचे दाखवून देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन तेथे महाआरती देखील केली होती. हाच संदर्भ धरून कल्याणमधील शिवसमर्थ मित्र मंडळाने राम मंदिर निर्माणाचा देखावा साकारत शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

शिवसेनेचे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख अरविंद मोरे संस्थापक विश्वस्त असलेल्या शिवसमर्थ मित्र मंडळाने हा देखावा साकारल्याने शहरातील राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्याण रेल्वे स्थानक व तहसीलदार कार्यालयाला लागून असलेल्या पट्टेवाली चाळ परिसरात शिवसमर्थ मित्र मंडळ असून त्यामार्फत दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाने राम मंदिर निर्माणाचा देखावा सादर केला आहे. येथील गणेश मूर्तीच्या मागे राम मंदिर दाखविण्यात आले असून रामाची धनुष्यधारी मूर्ती देखील साकारण्यात आली आहे. गणेश मूर्तीसमोर राम मंदिराच्या निर्माणासाठी साधुगण यज्ञ करीत बसलेले असून आजूबाजूला पोलिसांचा बंदोबस्त असल्याचा देखावा साकारला आहे. 

या देखाव्याने कल्याणकरांचे लक्ष वेधून घेतले असून हा देखावा चर्चेचा विषय ठरला आहे. देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी वाढत आहे. या देखाव्याबाबत सांगताना अरविंद मोरे म्हणाले की, ‘३७० कलम झांकी है, राम मंदिर बाकी है’ हा संदेश देणारा देखावा आमच्या मंडळाने उभारला आहे. रामजन्मभूमीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी त्याचा निर्णय हिंदुच्या बाजूने लागून लवकरात लवकर तेथे राम मंदिर उभे राहावे ही भावना या देखाव्यातून व्यक्त करण्यात आल्याचे ते म्हणाले.