विकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा प्रतिसाद

विकास फाउंडेशन आयोजित मोफत लसीकरणाला कल्याणकरांचा प्रतिसाद

कल्याण (प्रतिनिधी) कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या मोफत लसीकरणाला कल्याण मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ६१० नागरिकांचे लसीकरण करण्लेयात आले.

मंगळवारी कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने कल्याणमधील पारनाका विभागातील अभिनव विद्यामंदिर मधील डॉ. आनंदीबाई जोशी सभागृहात मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षांवरील युवक व नागरिकांसाठी पहिला डोस व ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देण्यात आला. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या नियोजनामुळे ६१० युवक व नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. 

वयोवृद्ध व ज्यांना चालायला त्रास होतो अश्या नागरिकांसाठी  कल्याण विकास फाऊंडेशन ने रिक्षा व बस उपलब्ध करून दिली होती व त्यातच लसीकरण उपलब्ध करून दिल्याने अशा जेष्ठ नागरिकांना मोठा फायदा झाला. या लसीकरण शिबिरात नागरिकांची काळजी घेतली जात होती. कोविनचे नोंदणी व सोबत आणलेले आधारकार्ड बघून लसीकरण केलं जातं होत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक डॉ. विनोद दौंड, समन्वयक डॉ. कुणाल सर्वगौड व डॉ. शशिकला यादव यांच्या टीमने  मोलाचे सहकार्य केले.

कोविड१९ सारख्या वैश्विक महामारीचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने संपूर्ण नागरिकांनी लस टोचून घेणे आवश्यक असून कल्याण विकास फाउंडेशन यासाठी प्रभावी नियोजन करून अधिकाधिक कल्याणकरांचे लसीकरण करणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी सांगितले तर अशा लसीकरणाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले. या लसीकरणाला छत्रपती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ना.क. फडके, अभिनव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संपत गीते व शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले