केडीएमसीचे २०२१-२२ सालचे १७००.२६ कोटी जमा व १६९९.२७ कोटी खर्चाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

केडीएमसीचे २०२१-२२ सालचे १७००.२६ कोटी जमा व १६९९.२७ कोटी खर्चाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ३३० कोटी ९६ लाख रुपये शिलकी असलेले १५९१ कोटी ८४ लाख जमा व १२६० कोटी ८१ लाख खर्चाचे सन २०२०-२१ चे सुधारित अर्थसंकल्प, तसेच आगामी २०२१-२२ च्या आर्थिक वर्षासाठी १७०० कोटी २६ लाख जमा व १६९९ कोटी २७ लाख खर्चाचे ९९ लक्ष रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करून प्रशासक म्हणून प्राप्त अधिकारात ते मंजूरही केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चालू वर्षाप्रमाणेच २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातही आरोग्य व्यवस्थेवर सुमारे ९७ कोटी १० लाख रुपये खर्च करण्याची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

२०२०-२१ चे मंजूर अंदाजपत्रक पहाता महापालिकेचे ७८३ कोटी १० लाख रुपयांनी उत्पन्न घटले असून १११३ कोटी ९५ लाख रुपये खर्चाला कात्री लावल्याचे दिसून येत आहे. आगामी २०२१-२२ च्या मंजूर तरतुदीपेक्षा ६७५ कोटी ५७ लाखांनी घसरलेले दिसत आहे.

आगामी वर्षांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाच महत्व देण्यात आले आहे. गतवर्षी कोरोना साथीवर १३५ कोटी खर्च झाले असून आगामी वर्षातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन ९७ कोटी १० लाखांची याकरिता तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. २५ दवाखाने सुरू करणे, टिटवाळा येथील शक्तीधाम व वसंत व्हॅली येथे नविन रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत, ४ डायलेसिस केंद्र, माड्युलर ओटी कँथलँब, पॅथॉलॉजी रेडिओलॉजी सुरू करणे, पी.पी.पी. तत्वावर वैद्यकीय नर्सिंग व आयुवर्दीक महाविद्यालय उभारणे, सार्वजनिक स्वच्छतेसाठी सुधारणा करून राहण्याजोगे शहर बनविण्यासाठी सुधारणा करणे, कर्मचारी  प्रशिक्षण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुलभता, क्लस्टर योजना राबविणे, नविन प्रशासकीय भवन बांधणे, नागरी सुविधा केंद्रे स्मार्ट करणे, थिंक टँक स्कीम राबविणे, रस्ते व शहर सौंदर्यीकरण करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत कामांना गती देणे, नौदल आर्ट गॅलरी उभारणे, उल्हास नदी किनारा सुशोभित करणे आदी प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच परिवहन उपक्रमासाठी ३५ कोटी महसूल व ४ कोटी भांडवली खर्चाची तरतुद आगामी वर्षात करण्यात आली आहे. 

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचे आकडेवारी पाहता पुढील वर्षीसुद्धा आरोग्य व्यवस्था अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प ६७४ कोटी रुपयांनी कमी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका विचारात घेता सन २०२१-११ सालचा अर्थसंकल्प वास्तववादी बनविण्याच्या प्रयत्न केल्याचे सूर्यवंशी यांनी आवर्जून नमूद केले आहे.

कामाची निकड व प्राधान्यक्रम ठरवून कामे करणे, महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळणे, अनावश्यक बाबींवर खर्च टाळणे, काटकसर करणे, आर्थिक स्थिती सुधारणेसाठी उपाययोजना करण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. उत्पन्नाची बाजू पाहता मालमत्ता कर ३६० कोटी, शासन अनुदान ३९२ कोटी अपेक्षित आहे. आगामी वर्षात महसुली उत्पन्न ९६८ कोटी १० लाख, भांडवली उत्पन्न ४०१ कोटी २१ लाख अपेक्षित आहे, तर महसुली खर्च ९६६ कोटी ७१ लाख व भांडवली खर्च ७३२ कोटी ५६ लाख होण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.