आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच केडीएमसीची प्रथमच विक्रमी कर वसुली

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच केडीएमसीची प्रथमच विक्रमी कर वसुली

कल्याण (प्रतीनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) आर्थिक वर्ष संपायला २ महिने बाकी असतानाच कर वसुलीचा इष्टांक ओलांडून विक्रमी कर वसुली केली आहे, तीही कोरोनाचे संकट घोंघावत असताना. ३१ जानेवारीपर्यंत थकबाकीसह एकूण ३७६ कोटी ८० लाखाची वसुली करण्यात महापालिकेच्या कर विभागाला यश मिळाले आहे. या वर्षी महापालिकेने अर्थसंकल्पात ३५० कोटींचे लक्ष ठरवण्यात आले होते.

महापालिकेचे कर निर्धारक व संकलक विनय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली. महापालिका स्थापन झाल्यानंतर प्रथमच अशी विक्रमी कर वसुली झाली असून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कुशल मार्गदर्शनामुळेच ही विक्रमी कर वसुली झाली असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी फक्त २४० कोटी ५० लाखांचीच वसुली झाली होती. आणि यावर्षी आतापर्यंत १३६ कोटींनी कर वसुली जादा झाली आहे. 

महापालिकेने दि. १५ ऑक्टोबर ते दि. १५ जानेवारीपर्यंत अभय योजना जाहीर केली होती. तिलाही अनपेक्षितरित्या भरघोस यश मिळाले आहे. सदर योजने अंतर्गत या वर्षी एकूण २३३ कोटी रुपये वसूल झाले आणि मागील वर्षी ही अभय योजना जाहीर केल्यानंतरही फक्त ६७ कोटीच वसूल झाले होते. गतवर्षीपेक्षा आताची वसुली १६६ कोटी रुपयांनी अधिक आहे.

कुलकर्णी यांना अधिक माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे पहिले चार महिने आम्हाला नुकसानच झाले होते. त्यांनी पुढे सांगितले की, उर्वरित दोन महिन्यात आणखी सुमारे ५० कोटी वसूल करण्याचे आमचे उद्दिष्ट असून एकूण ४२५ कोटींची कर वसुली करण्याचा आमचा प्रयत्न असून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते नक्कीच यशस्वी करू. त्यासाठी या महिन्यापासून आम्ही कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करीत आहोत.