केडीएमसी आयुक्तांच्या डोळ्यात सफाई कर्मचाऱ्यांची ‘धूळफेक’

केडीएमसी आयुक्तांच्या डोळ्यात सफाई कर्मचाऱ्यांची ‘धूळफेक’

कल्याण (प्रतिनिधी) :कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी कायापालट अभियान मोठ्या जोशात सुरु केले आहे. महापालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांनी मात्र या अभियानाच्या निमित्ताने थेट आयुक्तांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार चालवल्याचे समोर आ आहे. वरिष्ठ अधिकारीही या प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. 

रस्त्यांवर-पुलावर साचलेली रॅबीट, धूळ-कचरा काढणे, दुभाजक-पुलांवरील उगवलेले गवत काढणे आदी कामाच्या माध्यमातून रस्त्यांची सफाई करण्यासाठी महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रात कायापालट अभियान अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी सर्व प्रभाग क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या यंत्रणेला कामाला लावले आहे. त्या त्या प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्तांच्या निगराणीखाली हे विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. यानिमित्ताने सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्रीय झाली असताना आंबिवली परिसरात मात्र सफाई कर्मचारी या मोहिमेच्या निमित्ताने थेट आयुक्तांच्याच डोळ्यात धूळफेक केल्याचे समोर आले आहे.

वडवली येथे रेल्वे मार्गावरील वडवली उड्डाणपूलावर चार दिवसांपूर्वी कायापालट अभियान अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी पुलाच्या एका बाजूकडील संरक्षक कठड्याकडील धूळ-कचरा साफ करण्यात आला. त्याचवेळी पुलाच्या दुसऱ्या बाजूला ठिकठिकाणी गोळा कचरा केलेला धूळ-कचरा तसाच ठेवण्यात आल्याचे आजही दिसून येत आहे. या प्रकारची साफसफाई म्हणजे आयुक्त सूर्यवंशी यांच्याच डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख करणारे मुख्य आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आयुक्त काय करीत आहेत हा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांकडून केला जात आहे. सबंधित कामात हलगर्जीपणा करणाऱ्या, कामचुकार सफाई कर्मचारी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त कारवाई करणार का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.