केडीएमसीच्या आयुक्तांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी !

केडीएमसीच्या आयुक्तांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी !

कल्याण (प्रतिनिधी) : 
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आज महापालिका मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागांना भेटी देत कर्मचाऱ्यांची ‘हजेरी’ घेतली. यावेळी कार्यालयात अनुपस्थित तसेच लेटलतीफ कर्मचारी-अधिकाऱ्यांची त्यांनी नोंद घेतली असून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे कल्याणकरांचे  लक्ष लागले आहे.

बुधवारी सकाळी आयुक्त सूर्यवंशी मुख्यालयात आल्यानंतर त्यांनी प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांना बहुतांश अधिकारी-कर्मचारी कार्यालयात गैरहजर असल्याचे आढळून आले आले. विशेष म्हणजे महापालिकेचे काही प्रमुख अधिकारी देखील गैरहजर असल्याने आयुक्त हैराण झाले. आयुक्तांच्या अचानक पाहणीनंतर लेटलतीफ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आयुक्त काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी १ मार्च पासून राज्यात ५  दिवसांचा आठवडा आणि  २ दिवस सुट्टी असा कामकाजाचा आठवडा ठरल्याने राज्यातील सवर्च कामगार संघटनीना या निर्णयाचे स्वागत केले. २ दिवसांच्या सुट्टीमुळे कामाचा तास वाढला आहे. मात्र तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लेटलतीफपणा सुरूच आहे. तीन दिवसापूर्वीच केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सवर्च विभागांना कामकाजाचे  एक वेळापत्रक काढले आहे. डॉ. विजय सुर्यवंशी यांनी नुकताच महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच त्यांनी काही धडाकेबाज निर्णय घेत महापालिकेच्या कारभाराला तसेच शहराला शिस्त लावण्याचा पवित्रा घेतला आहे. आज त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांनाच दणका दिल्याने कामासाठी फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

‘त्यांचा’ही शोध लागेल?

महापालिकेचे काही सफाई कर्मचारी सकाळी लवकर येऊन दोनेक तासात झटपट कामे उरकून दहा साडेदहाच्या सुमारास घरी निघून जातात व दुपारी दोन वाजता मुख्यालयात येऊन बायोमेट्रिक मशीनवर थंब करीत असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने खाजगीत दिली आहे.

याचप्रमाणे काही कर्मचारी केवळ सकाळी मुख्यालयात येऊन बायोमेट्रिक मशीनवर थंब करून आपली दुसरे काम करण्यासाठी निघून जात असल्याचे काही कर्मचारी खाजगीत सांगत आहेत. बायोमेट्रिक मशीनच्या भागातील व इमारतीच्या प्रवेश द्वारावरील काही दिवसांचे सकाळ संध्याकाळचे  सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासल्यास हे दोन-दोन नोकऱ्या करणारे कर्मचारी कोण आहेत याचा शोध लागेल, अशीही चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.