प्रिस्क्रीप्‍शनशिवाय औषधे देणाऱ्या औषध विक्रेत्यांवर केडीएमसी करणार कारवाई

प्रिस्क्रीप्‍शनशिवाय औषधे देणाऱ्या औषध विक्रेत्यांवर केडीएमसी करणार कारवाई

कल्याण (प्रतिनिधी) : नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्‍शनशिवाय औषधे देणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सध्या रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णांची त्वरीत चाचणी होवून कोविड बाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याच्या दृष्टीकोनातून खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना त्‍यांच्याकडे येणा-या ताप रुग्णांची तातडीने कोविड चाचणी करणेबाबत यापूर्वीच सुचना देण्यात आलेल्या आहेत, असे असतांनाही बरेच रुग्ण हे ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्‍ल्याशिवाय औषधे घेतात आणि त्यामुळे त्यांना उपचार मिळण्यास विलंब होवून परिणामी अशा रुग्णांची प्रकृती खालावू शकते.

कोरोना साथीला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अनेकविध उपाययोजना करीत आहेत. महापालिका करीत असलेल्या या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून औषध विक्रेत्यांकडे येणा-या कोणत्याही रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्‍क्रीप्‍शन शिवाय औषधे देण्यात येवू नये, तसेच सदर औषध विक्रेत्यांनी त्यांच्याकडे येणा-या रुग्णांची नोंद, प्रिस्‍क्रीप्‍शन दिलेल्या डॉक्टरांचे नाव व पदनाम, रुग्णांचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक याची माहिती नजिकच्या नागरी आरोग्य केंद्राला देणेबाबत पत्र कल्याण डोंबिवलीतील सर्व औषध विक्रेत्यांना पाठविले आहे.

सदर पत्राच्या अनुषंगाने, सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्‍शन शिवाय औषधे देणा-या संबंधित किरकोळ औषध विक्रेत्यांविरुध्द कारवाईचा बडगा उगरण्यात येईल, असे त्यांचे पत्रान्वये कळविले आहे.