कडोंमपा: ३०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा कर माफ करण्याची मागणी 

 कडोंमपा: ३०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा कर माफ करण्याची मागणी 

कल्याण (सुरळकर आर. टी.) : 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ३०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सार्वजनिक पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हेही उपस्थित होते.

मागील महापालिका निवडणुकांच्या वेळी मुबई-ठाण्यासह अन्य महापालिकातील घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन काही राजकीय पक्षांकडून दिले गेले होते. कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गायकवाड यांनी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ३०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे समाजातील निराधार, वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, निराधार विधवा, परितक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके इत्यादींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून  महाराष्ट्र शासनामार्फत मिळणारे मासिक अर्थसहाय्य वाढवणे तसेच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा २१ हजारावरून १ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिव्यांगाच्या अर्थसाहाय्यात वाढ करण्याची आग्रही मागणीही गायकवाड यांनी केली आहे.