नागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण- श्रीनिवास घाणेकर

नागरी सुविधांचा बोजवारा उडण्याचे केडीएमसी उदाहरण- श्रीनिवास घाणेकर

कल्याण (प्रतिनिधी) : आपण नागरिक या देशाचे मालक आहोत. आपण मालक असल्याचा आपल्याला विसर पडला आपण देशाचे मालक असल्याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना व्हायला हवी. नागरिकांनी चांगले कार्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले पाहिजेत. तसे निवडून दिले नाहीत तर नागरी सुविधांचा कसा बोजवारा उडतो त्याचे कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) हे उत्तम उदाहरण आहे, असे स्पष्ट प्रतिपादन प्रख्यात माहिती अधिकार कार्यकर्ते तथा जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांनी नुकतेच कल्याण येथे बोलताना केले. 

आम आदमी पार्टीच्या वतीने नागरी समस्या व त्यावरील उपाय या विषयावर शहरातील सामाजिक संस्थांचे एक चर्चासत्र कल्याण पूर्वेतील आई तिसाई मॅरेज हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आपचे नेते तथा माजी सनदी अधिकारी किशोर मानध्यान, राष्ट्रीय सहसचिव रुबेन मस्करेहान्स, डॉ. संतोष करमरकर, योगगुरू सोमदेव महाराज, कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड आदी उपस्थित होते.

यावेळी घाणेकर पुढे म्हणाले की, कल्याणच्या तत्कालीन आमदारांनी एप्रिल २०१२ मध्ये ३५० खाटांचे महापालिकेच्या मालकीचे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासह राज्य शासनाकडून मंजूर करून आणले. पुढे महापालिकेने ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मधून करण्याचा ठराव केला. त्यासाठी टिटवाळा येथे ३८ एकर जागा आरक्षित आहे. आज जानेवारी २०२१ पर्यंत त्यात काडीमात्र प्रगती झालेली नाही आणि आमच्या लोकप्रतिनिधींना त्याची लाज वाटत नाही. आम्ही असे लोकप्रतिनिधी निवडून देतो. राजकीय पक्षांकडे जाऊ नका तर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय करतात ते पाहिले पाहिजे. ‘प्रजा तथा राजा’ ही म्हण पाहता अशी परिस्थिती बदलायची असेल तर पक्ष बघू नका तर योग्य, लायक कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्या असे आवाहन घाणेकर यांनी केले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील उद्याने, रुग्णालय, पोलीस ठाणे, रस्ते अशा आरक्षित भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. डोंबिवली पूर्वेत स्टेशनपासून जवळ एसटी स्टँडसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर कस्तुरी प्लाझा नामक इमारत उभी राहिली. परिणामी शहरातील प्रवाशांना दूर डोंबिवली जिमखाना जवळील एसटी स्टँडवर जावे लागते. अशीच परिस्थिती बहुतांशी महापालिकेतील डोंबिवली, कल्याण, आंबिवली टिटवाळा परिसरातील आरक्षित भूखंडांची झाली असल्याची माहिती श्रीनिवास घाणेकर यांनी दिली.

ते म्हणाले की, अधिकार बजावायचा तर प्रथम नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडायला हवी. अधिकार बजावण्यासाठी माहितीचा अधिकार हे एकमेव शस्त्र नाही तर अनेक शस्त्रे आहेत. ती समजण्यासाठी व त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी समविचारी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करायला हवे. मुळात दबावगट म्हणून त्यांनी काम करायला हवे. ठराविक मुदतीत काम व्हावे म्हणून केंद्राने व राज्याने दुसरा कायदाही आणला मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष केल्याचे घाणेकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले. याप्रसंगी किशोर मानध्यान, रुबेन मस्करेहान्स, डॉ. संतोष करमरकर, योगगुरू सोमदेव महाराज यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी चर्चासत्रात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश भोसले, योगेश पोखरकर, स्टॅलिन गील, अजित कदम, रक्तानंद ग्रुपचे अध्यक्ष नारायण पाटील, डॉ. शुभदा साळुंखे यांच्यासह अनेक नागरिकांनी सहभाग घेत कल्याण डोंबिवलीमधील नागरी समस्या व त्यावरील उपाय यावर उहापोह केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. धनंजय जोगदंड यांनी केले. प्रास्ताविक सीमा तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. सुप्रिया कर्पे यांनी केले.