केडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु

केडीएमसी; पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे साचलेल्या पाण्याचा हळू हळू निचरा झाला आहे, अशा पाण्याचा निचरा झालेल्या  ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आढळून येत आहे. पावसाळ्याच्या कालावधीत साथ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाणी साचलेल्या सर्व वसाहतींमध्ये जंतूनाशक फवारणी व धुरावणी करण्यात येत असून पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमार्फत  करण्यात येत आहे.

महापालिकेच्या कल्याण पूर्व येथील वालधुनी नदीच्या परिसरात असलेल्या चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. तेथील पाण्याचा निचरा झाल्यानंतर आता तेथे जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. सर्व चाळी, वसाहतीतील स्वच्छतागृहे देखील साफसफाई करून तेथे देखील जंतुनाशक फवारणी करण्याची कारवाई सुरू आहे. ई प्रभागातही नांदीवली येथील मोठ्या नाल्यातून वाहून आलेला गाळ उचलण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे.

अ प्रभागात अतिवृष्टीमुळे सखल तसेच नद्यांच्या काठी असलेल्या नागरी वस्तीमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून अनेक ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील परिसरातील नागरिकांनी टाकलेल्या ओल्या वस्तू/ कचरा उचलण्याची कारवाईदेखील मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे.

फ प्रभागातील कांचनगाव, गोग्रासवाडी,पाथर्ली या भागात अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचून  गाळ जमा झाल्यामुळे त्या भागातही जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.  डोंबिवली पश्चिम येथील अण्णा नगर वसाहतीत व इतर  चाळींमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, सदर ठिकाणी देखील जंतुनाशक फवारणी व कचरा उचलण्याचे काम  करण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांना अतिसार, कॉलरा, कावीळ या जलजन्य आजाराची लागवण होऊ नये त्याचप्रमाणे हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस या आजारांची लागण होऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत अशा सर्व परिसराचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तेथील पूर परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमार्फत  करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत सुमारे 15467 Doxy टॅबलेटचे वाटपही नागरिकांना करण्यात आले आहे.