केडीएमसी महापौरांनी उपटले अधिकाऱ्यांचे कान

केडीएमसी महापौरांनी उपटले अधिकाऱ्यांचे कान

कल्याण (प्रतिनिधी) :

कमालीची अस्वच्छता, दुर्गंधी आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे हैराण झालेल्या पत्रकारांनी शनिवारी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात एका कार्यक्रमासाठी आलेल्या महापौर विनिता राणे यांच्या सर्व प्रकार निदर्शनास आणून दिले. या तक्रारी ऐकून व्यथित झालेल्या महापौर राणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

गेले दीड महिनाभर प्रचंड अस्वच्छता झाली होती. विभागीय कार्यालयात 'ग' आणि 'फ' प्रभागाचे अधिकारी कार्यरत असतात. परंतु तरीही पत्रकार कक्षात प्रचंड धूळ, घाण झाली होती. याबाबत आयुक्त गोविंद बोडके यांच्यासह सर्वच राजकीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत असतात. परंतु तरीही अस्वच्छता असल्याने पत्रकारांना बसायला देखील भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. साठलेल्या कुजक्या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

अखेरीस कचऱ्याची उग्र दुर्गंधी येत असल्याने शनिवारी सर्व पत्रकारांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली. त्या सगळ्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यानंतर महापौर विनिता राणे यांनी दखल घेत प्रभाग अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. सोमवारी या कार्यलयात जेव्हा आपण येऊ तेव्हा मात्र कोणत्याही प्रकारच्या सबबी ऐकून घेतल्या जाणार नाहीत, अशीही तंबी महापौर राणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.