लोकग्राम पादचारी पूलासाठी केडीएमसीने रेल्वेला दिले ७८ कोटी 

लोकग्राम पादचारी पूलासाठी केडीएमसीने रेल्वेला दिले ७८ कोटी 

कल्याण (प्रतिनिधी)  : कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या लोकग्राम पादचारी पुलाच्या कामाला गती आली असून सदर पूल हा कल्याण रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा पूल धोकादायक झाल्याने तो पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या पूलाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत अनेक वेळेस बैठका सुद्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांतर रेल्वेने जुन्या पुलाच्या पाडकाम करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कल्याण पूर्व लोकग्राम पादचारी पुलाचे पाडकाम लवकर सुरु होणार आहे.

लोकग्राम येथील पुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात करून हे काम पूर्ण होणार आहे. हे पाडकाम सुरू असतानाच नव्या पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवा, जेणेकरून पाडकाम पूर्ण होताच नव्या बांधकामाला सुरुवात करता येईल, ही खा.डॉ. शिंदेची सूचना रेल्वेने मान्य केली असून या पुलासाठी लागणारे अंदाजित रक्कम ७८ कोटी कल्याण डोंबिवली महापालिकेने (केडीएमसी) रेल्वेकडे जमा केली असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले आहे.

रेल्वेने केवळ पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर पाडकाम संपण्याच्या आत पादचारी पूलाच्या बांधकामाची निविदा देखील रेल्वेकडून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांना सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे पाडकाम संपताच नव्या बांधकामाला लगेच सुरवात करण्यात कोणताही अडथळा व विलंब होणार नाही.