‘ब्रेक दि चेन’साठी केडीएमसी सज्ज; मास्क न घालणाऱ्यांची ॲन्टीजेन टेस्ट

‘ब्रेक दि चेन’साठी केडीएमसी सज्ज; मास्क न घालणाऱ्यांची ॲन्टीजेन टेस्ट

कल्याण (प्रतिनिधी) : लग्नसमारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित मंगल कार्यालय-लॉन ३० एप्रिलपर्यंत सिल करणार, अशा सूचना  पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी दिल्या.  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून अंमलबजावणी करणेकामी संपन्न झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.  भाजी मंडई व लग्न समारंभ यामधील गर्दीमुळे कोरोना रुग्‍णांची संख्या वाढण्याचा संभव जास्त असल्यामुळे या बाबींवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे, असेही ते पुढे ते म्हणाले.

मंगल कार्यालय-लॉन येथे पोलिस व महापालिका कर्मचारी यांनी समारंभाच्या वेळी समक्ष उपस्थित राहून नियंत्रण ठेवावे, अशा सुचना अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता कराळे यांनी यावेळी केल्या. त्याचप्रमाणे हॉस्टस्पॉट एरियाजवळ बॅरिकेड्स लावाव्यात म्हणजेच संबंधित परिसरातील नागरिक जागरुक राहतील, असेही ते पुढे म्हणाले. मास्क न घालणा-या नागरिकांवर महापालिका दंडनिय कार्यवाही करीत असूनही अजून अनेक नागरिक मास्क न घालता फिरतांना दिसून येतात, त्यामुळे त्यांच्यावर यापुढे कठोर कारवाईचा इशारा पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या बैठकीत दिला. मास्क न घालणा-या व्यक्तिंची ॲन्टीजेन टेस्ट करण्याच्या कारवाईस लवकरच सुरुवात केली जाईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. मास्कच्या कारवाईसाठी पोलिसांनाही पावती पुस्तके दयावीत अशा सुचना अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता कराळे यांनी यावेळी दिल्या.

होम आयसोलेशन मधील रुग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्याचेवरही कारवाई केली जाईल, असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेच्या दुकानांबाहेर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन होण्यासाठी दुकानदारांनी सोशल डिस्टसिंगचे मार्कींग करावे आणि हे मार्कींग झाले आहे की नाही याची खातरजमा प्रभागक्षेत्र अधिका-यांनी व पोलिस प्रशासनाने करावी, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. सदर बैठकीस अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता कराळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, पोलिस उपायुक्त परिमंडळ-३ विवेक पानसरे, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाँ. अश्विनी पाटील, महापालिका साथरोग नियंत्रण अधिकारी डाँ. पानपाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार आदी उपस्थित होते.